Published On : Wed, Apr 25th, 2018

महानगरपालिकेचे उद्यान जैवविविधतेने परिपूर्ण होणार : दिव्या धुरडे

नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे नवीन व जुने उद्यान हे जैवविविधेतेने परिपूर्ण असणार असल्याची घोषणा जैवविविधता समिती सभापती दिव्या धुरडे यांनी केली. बुधवारी (ता.२५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जैवविविधता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी समिती सदस्य सोनाली कडू, आशा नेहरू उईके, उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना दिव्या धुरडे म्हणाल्या, जैवविविधता सारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे गरजेचे आहे. मनपाच्या सर्व उद्यानात जैव विविधतेचे वृक्ष लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तलावाच्या ठिकाणी कोणते वृक्ष लावावे, नाल्याच्या काठी कोणते वृक्ष लावावे, शाळेच्या मैदानात कोणते वृक्ष लावावे व कोणते वृक्ष लावू नये याची यादी तयार करण्यात यावी, ती यादी वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी, असे निर्देश दिव्या धुरडे यांनी दिले.

मनपाच्या प्रस्तावित उद्यानांपैकी काही उद्याने हे शंभर टक्के ‘बायोडायव्हर्सिटी गार्डन’ म्हणून राहणार आहे. त्यासाठी राजभवन येथील उद्यानाचा समिती पुढील आठवड्यात दौरा करेल, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या बाहेर कुठे शंभर टक्के बायोडाव्हर्सिटी गार्डन जर असेल तर त्याची माहिती उद्यान विभागाने समितीला कळवावी, अशा सूचना केल्या.

शहरातील तलावाच्या सभोवताल असलेल्या जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना समिती करणार आहे, याबाबत त्यांनी उद्यान अधीक्षकांमार्फत माहिती घेतली. तलावाच्या सभोवताल स्वच्छता ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला अंबरिश घटाटे, दिलीप चिंचमलातपुरे, नंदकिशोर शेंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.