Published On : Sat, Jun 19th, 2021

३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात

Advertisement

१०५ केंद्रावरून १० हजार नागरिकांनी घेतली लस

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारपासून (ता. १९) ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ऑनलाईन नोंदणी आवश्यक असलेल्या या लसीकरणाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. विविध स्लॉटमध्ये सकाळी १० पासून सायंकाळी ५ पर्यंत शहरातील १०५ केंद्रावरून सुमारे १० हजार नागरिकांनी लसीकरण करून घेतले.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी (ता. १८) रात्री ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे जाहीर करण्यात आले. यासाठी नागपूर महानगरपालिकेने पूर्वीच नियोजन केलेले होते. त्यानुसार शहरातील एकूण १०५ केंद्रांवरून लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोज घेण्यासाठी संबंधित वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक होती. शुक्रवारी रात्री ८.३० वाजतापासून कोव्हिन ॲपवर ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला आणि अवघ्या काही वेळातच संपूर्ण सत्रातील नोंदणी बुक झाली. काही केंद्रांवर २०० तर काही केंद्रांवर १०० डोजेस उपलब्ध करून देण्यात आले होते.

आज सकाळपासूनच ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह दिसून आला. प्रत्येकाने दिलेल्या स्लॉटमध्ये जाऊन लसीकरण करून घेतले. नागपूर महानगरपालिकेच्या अशा उत्कृष्ट नियोजनामुळे कुठल्याही केंद्रावर अतिरिक्त गर्दी आढळून आली नाही. प्रत्येक केंद्रावर नागरिकांनी कोरोनासंबंधित नियमांचे पालन करून लसीकरण करून घेतले.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी (ता. १८) महापौर दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली होती. नागपूर महानगरपालिकेची संपूर्ण तयारी असून शासनाच्या निर्देशांची वाट बघत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासंदर्भात रात्री शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर नियोजनानुसार शनिवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी डिक दवाखाना लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली. नियोजन आणि व्यवस्थेबद्दल समाधान व्यक्त केले.

सर्व केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण
शुक्रवारपर्यंत शहरातील बहुतांश सर्वच केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू होते. ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर प्रारंभी ८१ केंद्रावरून ते करण्याचे आणि उर्वरीत केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार होते. मात्र आता सर्व १०५ केंद्रावरून ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. शिवाय ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’अंतर्गत सुद्धा ३० ते ४४ आणि ४५ वर्षावरील अशा दोन्ही वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन
४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

दिव्यांगांनीही घेतली लस
३० ते ४४ वयोगटातील लसीकरण जाहीर झाल्यानंतर शनिवारी पाचपावली स्त्री रुग्ण लसीकरण केंद्रात पोलिओमुळे दिव्यांग झालेल्या ३६ वर्षाच्या रुग्णाला कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला. ह्या रुग्णाला कारमध्ये आणण्यात आले होते. मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कारमध्ये लस दिली.

Advertisement
Advertisement