Published On : Fri, Apr 30th, 2021

१ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण

Advertisement

महापौर – मनपा आयुक्तांचे लस घेण्याचे आवाहन

नागपूर : केन्द्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार महाराष्ट्र दिन १ मे पासून १८ वर्ष ते ४४ वर्षा पर्यंतचे नागरिकांचा कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम नागपूरात ही सुरु होणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमाने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार म.न.पा.चे इंदीरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन हॉस्पीटल इमामवाडा व पाचपावली सुतिकागृह रुग्णालय या तीन केन्द्रांवर लसीकरण कार्यक्रम शनिवार दुपार पासून सुरु होईल. पहिल्या दिवशी शनिवारी १ मे ला दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत लसीकरण होईल. त्यानंतर दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण या तीन केन्द्रांवर सुरु राहील.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी युवा वर्गाला जास्तीत – जास्त प्रमाणात लसीकरण करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की लसीकरण कोरोनाच्या विरोधात मोठे अस्त्र आहे. महापौरांनी सांगितले की महाराष्ट्र दिनापासून युवकांचे लसीकरण सुरु होणे दुग्ध शर्करा योग आहे. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी मोठी संधी युवकांना उपलब्ध करुन दिली आहे, या संधीचा युवकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा. तरुण वर्गाच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र शासनाकडून नागपूर महानगरपालिका व नागपूर जिल्हा मिळून एकूण दहा हजार लस प्राप्त होणार आहे. सध्या शासकीय केन्द्रांवर सुरु होणारी लसीकरण मोहिम नि:शुल्क राहणार आहे. राज्य शासनाने सध्या फक्त ३ नवीन लसीकरण केन्द्र तरुण वर्गासाठी नागपूरात उघडण्याचे निर्देश दिले आहेत.

आता १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना आरोग्य सेतु किंवा कोविन ॲप वर ऑन लाईन नोंदणी करुन आपली लसीकरणाची अपाईंटमेंट निश्चित करायची आहे. कुणालाही ऑफ लाईन नोंदणी करता येणार नाही. केवळ ऑन लाईन नोंदणी झालेल्यांनाच लस घेता येणार असून लसीकरणासाठी केन्द्रावर येतांना त्यांनी आपले आधारकार्ड सोबत आणावे.