Published On : Fri, Apr 30th, 2021

पक्वासा रुग्णालयात नवे कोव्हिड रुग्णालय रविवार पासून सुरु होणार

Advertisement

ना. नितीन गडकरी यांनी केले निरीक्षण

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने क्रीडा चौकातील भारतीय वैद्यक समन्वय समिती संचालित पक्वासा रुग्णालय व श्री आयुर्वेद महाविद्यालयात कोव्हिड रुग्णालयाचे निरीक्षण गुरुवारी (ता. २९) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. रुग्णालयामध्ये लावलेल्या ऑक्सीजन लाईनचे अंतिम निरीक्षण झाले आहे. याबाबतचे प्रमाणपत्र यांत्रिक अभियंता विभागाकडून शनिवारी (१ मे) प्राप्त होईल म्हणून रुग्णालय रविवार (२ मे) पासून जनतासाठी सुरु करण्यात येईल.

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार सर्वश्री. गिरीश व्यास, प्रवीण दटके, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी सिमिती सभापती प्रकाश भोयर, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, नगरसेविका उषा पॅलेट, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, उपायुक्त मिलिंद मेश्राम, भारतीय वैद्यक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश शर्मा, सचिव डॉ. गोविंदप्रसाद उपाध्याय, ट्रस्टी संजय जोशी, डॉ.संजय शर्मा, प्राचार्य डॉ. मोहन येवले, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अर्चना दाचेवर, डॉ. जयकृष्ण छांगाणी, डॉ.मनीषा कोठेकर, हर्षा छांगाणी, मैत्री परिवाराचे अध्यक्ष संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, डॉ. समीर गिरडे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेन्द्र बहिरवार आदी उपस्थित होते. सर्वप्रथम श्री गडकरी यांच्या हस्ते धन्वंतरी पुजन करण्यात आले.


याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांनी रुग्णालयातील संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. मोहन येवले व मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अर्चना दाचेवर यांनी रुग्णालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली. पक्वासा रुग्णालयातील १०० खाटांच्या रुग्णालयामुळे आरोग्य यंत्रणेवर पडलेला ताण काही प्रमाणात का होईना कमी होईल. हा काही प्रमाणात दिलासा असला तरी शहरात मनपाच्या वतीने पुन्हा काही रुग्णालये सुरू होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या रुग्णालयाच्या संचालनात मैत्री परिवार संस्थेचे सहकार्य लाभणार आहे. रुग्णालयासाठी नागपूर महानगरपालिके तर्फे ऑक्सीजन लाईन, औषधी, जेवण, डॉक्टर्स, नर्सेस ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी भारतीय वैद्यक समन्वय समिती सोबत चर्चा करुन त्यांना कोव्हिड रुग्णालय सुरु करण्यासाठी सूचना केली होती. त्याची दखल घेवून रुग्णालय सुरु केल्याबबदल महापौरांनी समितीचे आभार मानले आहे.

यावेळी रुग्णालयाच्या मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. अर्चना दाचेवर, परिचारिका वर्षा सुरमवार, स्वच्छता कर्मचारी विक्की बडेल यांचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.