Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Apr 30th, 2021

  कोरोनामुळे निर्माण झालेल्या ताणतणावाचे व्यवस्थापन

  आज सगळीकडे कोरोना रुग्णांची वाढती संख्या, जळणाऱ्या चिता, लोकांचा आक्रोश, ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिव्हीरची कमतरता, बेडची कमतरता असे चित्र महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. मान्य आहे की कोरोना विषाणू आहे पण आजची मृत्यूसंख्या ही केवळ कोरोनामुळे नसून कोरोनामुळे निर्माण झालेल्या ताणतणावाच्या परिस्थितीमुळे झाली आहे.

  रुग्णाला जेव्हा सर्वप्रथम कळत की त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तेव्हा त्याच्या मनात भिती, घबराहट, ताण-तणाव, चिंता निर्माण होते. मला बेड मिळेल काय ? इंजेक्शन मिळेला का ? मी एकटा कसा राहील ? मी माझ्या कुटूंबाला सोडून 14 दिवस कसा जगेल ? ऑक्सिजन नाही मिळाला तर ? माझा मृत्यू झाला तर ? असे असंख्य प्रश्न रुग्णांच्या मनात निर्माण होतात. सतत तेच तेच विचार मुख्यत्वे नकारात्मक विचार करणे, त्यामध्ये आपला वेळ, आपली शारीरिक व मानसिक उर्जा घालवणे, प्रसारमाध्यमावरील बातम्या पाहणे, मोबाईलवर व्हॉट्स ॲप ग्रुपवर नकारात्मक चर्चा पाहणे या गोष्टी करण्यास रुग्णाकडून सुरूवात होते. त्यामुळे आपण समजून घ्यायला हवं की, ज्याप्रकारे शारीरिक आजाराचा परिणाम आपल्या मानसिक आजारावर होतो. त्याचप्रकारे मानसिक बाबींचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर होतो.

  सतत नकारात्मक विचार केल्याने जो ताण निर्माण होतो. त्यामुळे रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, थकवा, रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे इत्यादी बाबी रुग्णामध्ये दिसण्यास सुरूवात होते. याशिवाय जेवण कमी केल्याने प्रतिकार क्षमतेवर प्रतिकूल परिणाम बघावयास मिळतो. त्यामुळे रुग्णांची शारीरिक व मानसिक स्थिती ढासाळण्यास सुरूवात होते. रुग्ण औषधोपचारांना प्रतिसाद देत नाही आणि प्रसंगी त्याचा मृत्यू सुध्दा होत असतो. सांगायचा मुद्दा हाच की, कोरोना ही एक जागतिक महामारी आहे. आपण तिला मात देवून जीवन पुन्हा नव्याने आनंदाने सुखाने जगू शकतो. मात्र आपण सर्वांनी तिचा इतका धसका घेतला आहे की, ज्यामुळे आपल्या मनावर त्याचा मोठा मानसिक परिणाम झाला आहे. म्हणूनच रुग्ण मृत्यू संख्या वाढत चालली आहे आणि रुग्णामध्ये ताण-तणाव, चिंता, आत्महत्येची प्रवृत्ती वाढायला लागली आहे. नकारात्मक बाबी टाळायला हव्यात. नेहमी सकारात्मक विचार ठेवावा. आजाराला समोरे जातांना मनोबल उंच ठेवणे आवश्यक आहे.

  यामधून मार्ग काढणे हे आपल्याच हातात सर्वस्वी आहे. त्यासाठी फक्त आपल्याला ताण-तणावाचे व्यवस्थापन करता यायला हवे. सर्वप्रथम रुग्णाने पॉझिटिव्ह आहे हे कळल्यावर स्वत:ला आयसोलेट करुन घ्यावे. इंजेक्शन न मिळाल्यास डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे सेवन करणे, नाश्ता करणे, जेवण व्यवस्थित करणे, समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञांशी फोनवर बोलणे, रोज व्यायाम करणे, चालणे, श्वसनाचे व्यायाम करणे, बागकाम करणे, निर्सगाशी हितगूज करणे, आपल्याला आवडणार एखादं वाद्य वाजवणे, आत्मचरित्र वाचणे, सकारात्मक विचार असणाऱ्या मित्रांशी फोनवर बोलणे, प्रसारमाध्यमांचा वापर कमी करणे, घरच्यांशी सकारात्मक बोलणे, जे रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांचे अनुभव ऐकणे व त्यांची अंमलबजावणी करणे यासारख्या बऱ्याच बाबी आहेत ज्यांच्या वापर करून आपण कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावाला अगदी हसत हसत सामोरे जावून कोरोनाला हरवू शकतो व पुन्हा नव्याने जीवन आनंदाने जगू शकतो.

  -डॉ. विरेंद्र बांते


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145