Published On : Mon, May 3rd, 2021

प्रभाग २६ मधील कोहिनूर लॉनमध्ये सोमवारपासून लसीकरण

ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रयत्नाने केंद्र सुरू

नागपूर : नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग २६ मधील कोहिनूर लॉन, शैलेश नगर, वाठोडा रिंग रोड येथे सोमवार (ता.३)पासून निःशुल्क लसीकरण केंद्राला सुरुवात होणार आहे.

प्रभाग २६ (अ)चे नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांच्या विशेष प्रयत्नाने हे लसीकरण केंद्र सुरू होत आहे. सोमवारी (ता.३) पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे व प्रभाग २६ चे सर्व नगरसेवक, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात होईल.

सदर लसीकरण केंद्रावर सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण सुरू राहिल. सद्यस्थितीत ४५ वर्षावरील व्यक्तींना केंद्रावर लस दिली जाईल. यानंतर मनपा प्रशासनाद्वारे सूचना मिळाल्यानंतर १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू केले जाईल. परिसरातील सर्व पात्र व्यक्तींनी लसीकरणासाठी नोंदणी करून लस घ्यावी असे आवाहन, स्थानिक नगरसेवक ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.,