Published On : Mon, Mar 1st, 2021

ज्येष्ठ नागरिकांसाठी आजपासून ११ केंद्रावर लसीकरण

नागपूर : आरोग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर यांच्यासाठी सुरू असलेल्या नियमित लसीकरणासोबतच सोमवार १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोव्हिड लसीकरणाला सुरुवात होत आहे. नागपूर शहरात ११ शासकीय केंद्रावरून लसीकरण करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांसोबतच गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या ४५ वर्षावरील व्यक्तींनाही लस घेता येणार आहे. १ मार्चपासून सुरू होणारे लसीकरण तूर्तास आरोग्य विभागाने निर्धारित केलेल्या ११ शासकीय केंद्रावरुनच घेता येणार आहे. पहिल्या टप्प्यात जे आरोग्य कर्मचारी अथवा फ्रंट लाईन वर्कर यांची नोंदणी न झाल्यामुळे लस घेऊ शकले नाही त्यांनाही या केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल आणि लस घेता येईल. शासकीय केंद्रांवरुन १ मार्चला सकाळी ९ वाजतापासून लसीकरणाला सुरुवात होईल तर खासगी केंद्रांवरून दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

शासकीय केंद्राची नावे
पाचपावली येथे दोन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन केंद्र, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय दोन केंद्र, झिंगाबाई टाकळी येथील पोलिस रुग्णालय, गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल, एम्स, ईएसआयएस हॉस्पीटल या केंद्रावर जाऊन ६० वर्षांवरील व्यक्तींना आणि ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस घेता येईल. ही शासकीय केंद्रे लसीकरणासाठी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत सुरू राहतील.

काय सोबत असावे?
ज्यांना लस घ्यावयाची त्यांनी लसीकरण केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे. आधार कार्ड नसेल तर ज्या ओळखपत्रावर जन्मतारीख असेल असे ओळखपत्रही नोंदणी ठिकाणी दाखवून नोंदणी करता येईल. जे फ्रंट लाईन वर्कर आहे त्यांनी त्यांच्या नोकरीतील ओळखपत्र आणि जे आरोग्य कर्मचारी आहे त्यांनी त्यांच्या रुग्णालयाचे ओळखपत्र दाखवून नोंदणी करवून घ्यावी. प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन नोंदणी करता येईल तसेच ‘कोवीन’ अथवा ‘आरोग्य सेतू’ या ॲपद्वारेही घरबसल्या ऑनलाईन नोंदणी करता येईल.