Published On : Mon, Mar 1st, 2021

पाचपावली लसीकरण आणि विलगीकरण केंद्राची महापौरांनी केली आकस्मिक पाहणी

सुतिकागृहात रात्र पाळीत डॉक्टर नेमण्याचे तर विलगीकरणात केंद्रात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणा ज्या पद्धतीने कार्य करीत आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि व्यवस्थेची पाहणी करण्याच्या दृष्टीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाचपावली सुतिकागृह येथे असलेल्या लसीकरण केंद्राची आणि पाचपावली विलगीकरण केंद्राची रविवारी (ता. २८) आकस्मिक पाहणी केली. ज्या त्रुट्या आढळल्या त्या तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले तर दिवसरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.

सर्वप्रथम महापौर दयाशंकर तिवारी यांनी पांचपावली सुतिकागृहाला भेट दिली. येथे लसीकरण केंद्र असून या केंद्रात आतापर्यंत तीन हजार आरोग्य सेवक आणि फ्रंट लाईन वर्कर्सना लस देण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. लसीकरणाच्या नोंदणीसाठी दोन काउंटर आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना सुतिकागृहात येणाऱ्या गर्भवती महिलांची प्रसूतीसुद्धा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आसीनगर झोन सभापती श्रीमती वंदना चांदेकर यांनी महापौरांना रात्रीच्या वेळी डॉक्टरांची व्यवस्था करण्यासंदर्भात मागणी केली.

रात्रीच्या वेळी डॉक्टर्स नसल्यामुळे गरीब महिलांना फटका बसत असल्याचे श्रीमती चांदेकर यांनी सांगितले. ही समस्या लक्षात येताच महापौरांनी तेथूनच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांच्यासोबत दूरध्वनीवरून चर्चा करून रात्र पाळीत डॉक्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी यांना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी प्रतीक्षा कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची सूचना केली. डॉ. विजय जोशी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ खंडाईत यावेळी उपस्थित होते.

यानंतर महापौरांनी पाचपावली विलगीकरण केंद्राला भेट दिली. या केंद्रावरदररोज १०० नागरिकांची चाचणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी विलगीकरणात असलेल्या व्यक्तींसोबत चर्चा केली. विलगीकरण केंद्रातील व्यवस्थेबद्दल तेथे असलेल्या व्यक्तींनी गौरवोद्‌गार काढले आणि समाधान व्यक्त केले. नागरिक सदावर्ते यांनी साफसफाई आणि शौचालय नेहमी साफ केले जात नसल्याचे महापौरांना सांगितले.

सफाई कामगार अनिल यांनी सफाई कर्मचारी कमी असल्यामुळे सफाई नियमित होत नसल्याची माहिती दिली. मात्र महापौरांनी तात्काळ सहाय्यक आयुक्त गणेश राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून सफाई कामगारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. या निर्देशानंतर काही वेळातच तेथील शौचालयांच्या स्वच्छता कार्याला प्रारंभ झाला.