Published On : Fri, May 14th, 2021

व्‍ही.आर. नागपूरमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला सुरूवात

पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ज्येष्ठांच्या लसीकरणाचा शुभारंभ

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरामध्ये ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी लसीकरणासाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ला सुरूवात केली. सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉल पाठोपाठ शुक्रवारी (१४ मे) शासकीय वैद्यकीय महाविद्यालया(मेडिकल)जवळील रामबाग येथील व्‍ही.आर. नागपूर (ट्रिलियम) मॉल येथे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या हस्ते ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा शुभारंभ झाला.

याप्रसंगी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार अभिजीत वंजारी, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., आरोग्य समिती सभापती महेश महाजन, धंतोली झोन सभापती वंदना भगत, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक आयुक्त किरण बगडे, डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. तेघा जईतवार, प्रसन्ना तिडके आदी उपस्थित होते.

मेडिकल चौकातील व्‍ही.आर. नागपूर (ट्रिलियम)मॉलमध्ये ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे ‘कोव्हिशिल्ड’ची सर्वप्रथम लस घेणारे ८३ वर्षीय श्यामदास छाबरानी व ६२ वर्षीय क्रिष्णा छाबरानी यांचे ना.डॉ.नितीन राउत यांनी गुलाबपुष्प देउन स्वागत केले. मनपाच्या दवाखान्यातील परिचारिका शुभांगी कठाणे व राणी खुजे यांनी सर्व पात्र नागरिकांना लस देउन लस घेतल्यानंतर घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी पालकमंत्री डॉ.नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या संकटकाळामध्ये नागपूर महानगरपालिका उत्तम कार्य करीत आहे. मनपाची संपूर्ण आरोग्य यंत्रणा नागपूरकर जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहे. आज संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक बेड्स उपलब्ध करून देण्यामध्ये नागपूरचे नाव आहे. याशिवाय राज्यामध्ये सर्वाधिक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसुद्धा आपल्या नागपुरातच आहेत. लसीकरणामध्ये नागपूर शहर पुढे आहे, ही बाब आनंददायी असून यामुळे अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. याच कार्यामध्ये आता ६० वर्षावरील ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी महत्वाचा पुढाकार घेण्यात आला आहे. ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे घरी अंथरूणाला खिळलेले व अन्य प्रकारचा त्रास सहन न करू शकणा-या ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी ऑनलाईनरित्या किंवा ऑफलाईनरित्या नोंदणी करून घ्यावी व ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’द्वारे ज्येष्ठांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही ना.डॉ. नितीन राऊत यांनी केले.