Published On : Fri, May 14th, 2021

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांच्या सदैव पाठिशी

– ना. नितीन गडकरी : डॉ. दंदे फाऊंडेशनच्या कोव्हिड हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर : सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांच्या पाठिशी मी सदैव उभा आहे. ही बांधिलकी जपणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉ. पिनाक दंदे यांचा विशेषत्वाने समावेश होतो, असे गोरवोद्गार केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतुक तसेच सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) काढले. डॉ. दंदे फाऊंडेशनच्या कोव्हिड हॉस्पिटलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या धरमपेठ येथील नागरिक सहकारी रुग्णालयाच्या वास्तूत डॉ. दंदे फाऊंडेशनने कोव्हिड हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ राजकीय व सामाजिक कार्यकर्ते अनंतराव घारड अध्यक्षस्थानी होते. तर राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार आणि महापौर दयाशंकर तिवारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. दंदे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे यांची व्यासपिठावर उपस्थिती होती. नितीन गडकरी म्हणाले, “सामाजिक जाणीव ठेवून काम करणाऱ्या खासगी डॉक्टरांना गेल्या काही दिवसांमध्ये मी वेगवेगळ्या स्वरुपात मदत केली. त्यात डॉ. दंदे हॉस्पिटललाही मी ७ व्हेंटिलेटर आणि ५ बायपॅप मशीन दिल्या. याशिवाय २४ लाख रुपयांची अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिली. आता त्यांच्या दोन्ही हॉस्पिटलसाठी १ कोटी रुपये खर्च करून हवेतून आक्सीजन काढणारे युनीटही येत्या काही दिवसांत मी लावून देणार आहे.”

‘डॉ. दंदे माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना नागरिक सहकारी रुग्णालयाच्या भानगडीत पडू नका असे सांगून निराश केले होते. मात्र त्यांनी हिंमत केली. त्यामुळे त्यांना कुठलीही अडचण आली तरीही मी त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे,’ असा विश्वास नितीन गडकरी यांनी दिला. माझ्यासारखे शंभर लोक मागे लागले असते तरीही हे शक्य झाले नसते. न्यायालयाने या रुग्णालयाच्या इमारतीचा योग्य वापर करण्याचे आदेश दिल्यामुळे मार्ग मोकळा होता. पण अनंतरावांसारखी व्यक्ती डॉ. दंदे यांच्यासोबत उभे असल्यामुळे फाऊंडेशनच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम प्रत्यक्षात साकार होऊ शकला, असेही नितीन गडकरी म्हणाले. तिसरी लाट येणारच आहे, असे समजून आपण तयारी ठेवावी, असे आवाहनही नितीन गडकरी यांनी वैद्यकीय क्षेत्राला व प्रशासनाला केले.

डॉ. दंदे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सुनील केदार म्हणाले, ‘’कुणी स्वप्नातही विचारही केला नसेल ते काम डॉ. पिनाक दंदे यांनी करून दाखविले आहे. आम्ही देखील त्यांच्या कृतीतून प्रेरणा घ्यावी असा हा उपक्रम आहे.” अध्यक्षीय भाषण करताना अनंतराव घारड म्हणाले, ‘’इथे रुग्णालय सुरू करण्याची कुणाचीही हिंमत झाली नाही. त्यामुळे डॉ. दंदे पैसा खर्च करत असताना मला चिंता वाटत होती. त्यांनी मात्र या इमारतीचे रुपच पालटले. कोरोनाचा उद्रेक सुरू असताना हे रुग्णालय सुरू झाले त्याबद्दल विशेष समाधान आहे.” “नागरिक सहकारी रुग्णालय हे एकेकाळी शहरातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होते. सुरुवातीपासून विविध पक्षांची मंडळी या संस्थेवर होती. पण पक्षीय राजकारणाचा वावर इथे कधीच नव्हता,” असेही ते म्हणाले. राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे, खासदार कृपाल तुमाने, आमदार डॉ. परिणय फुके, माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश बोरकुटे, प्रवीण महाजन, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक अजय कडू यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. पिनाक दंदे यांचे वडील डॉ. गंगाधरराव दंदे, पत्नी डॉ. सीमा दंदे, कनिष्ठ बंधू सारंग दंदे, कन्या डॉ. अनुभा, मुलगा अमृत हे देखील यावेळी आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ संपादक बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले. डॉ. नृपाल दंदे यांनी आभार मानले.

तीन आठवड्यांत उभे केले सुसज्ज रुग्णालय : डॉ. पिनाक दंदे
डॉ. पिनाक दंदे प्रास्ताविक करताना म्हणाले, “नागपुरात रुग्णांचे खाटांसाठी, आयसीयूसाठी हाल होत असताना मन व्यथित झाले होते. त्यावर सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काय करू शकतो, याचा मी विचार करीत होतो. अश्यात नागरिक रुग्णालयातच कोव्हीड हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार मनात आला. पहिल्यांदा आलो तेव्हा या इमारतीचे रुप पालटणे शक्य होईल का याबाबत सर्वांना शंका होती. इमारतीच्या परिसरात सापांचा साम्राज्य होते. स्लॅबला भेगा पडलेल्या होत्या. पण आमच्या मजुरांनी व सफाई कामगारांनी तीन आठवडे अविरत कष्ट घेऊन इमारतीचा व परिसराचा चेहरा मोहरा बदलला.”

६० खाटांची व्यवस्था असून त्यातील १५ आयसीयू बेड आहेत. प्रत्येक बेडला आक्सीजनची व्यवस्था आहे. नितीनजींनी आम्हाला दिलेले व्हेंटिलेटर व बायपॅपही या रुग्णालयात वापरले जाणार आहेत, अशी माहिती डॉ. दंदे यांनी दिली.