Published On : Thu, Jun 7th, 2018

एल्गार परिषदेसाठी नक्षलवाद्यांचा पैसा वापरला – पुणे पोलीस

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एल्गार परिषदेच्या या आयोजनात नक्षलवाद्यांचा आर्थिक सहभाग होता. एल्गार परिषदेच्या या कार्यक्रमाला नक्षलवाद्यांचा पैसा वापरला गेला आहे. अशी माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात काल सुधिर ढवळेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग यांना १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजता कोर्टात याबाबत सुनावणी झाली आहे. तर इतर चार जणांना तीन वाजता कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

एल्गार परिषदेत गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयुचा विद्यार्थी नेता उमर खालीद, माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आदि सहभागी झाले होते. या एल्गार परिषदेच्या सुरुवातीला कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला सादर केलेल्या गीतातून लोकांना भडकवण्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी ७ जानेवारीला विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या एल्गार परिषदेनंतर दुस-या दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली ही दंगल घडवून आणण्यात नक्षलवाद्याचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.