Published On : Thu, Jun 7th, 2018

पावसात अडीच तास वाहतूक नियंत्रित करणाऱ्या हवालदारावर कौतुकाचा वर्षाव

Advertisement

मुंबई : मुंबई शहरातील काही भागात सोमवारी मुसळधार पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसाने मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवली. या पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली. त्यात पावसात भिजत वाहतूक नियंत्रित करणाऱ्या एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक पोलीस तब्बल अडीच तास भर पावसात उभं राहून वाहतूक नियंत्रण करताना दिसतो आहे. त्या रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने हा व्हिडीओ शूट करून शेअर केला आहे.

नंदकुमार इंगळे (वय 47) असं या ट्रॅफिक पोलिसाचं नाव असून कांदिवली पूर्व येथील आकुर्ली भागात ते ड्युटीवर होते. अचानक मुसळधार पाऊस व जोराचा वारा सुरू झाला. वाहतूक विस्कळीत झाली. वाऱ्याचा वेग इतका होता की स्कायवॉक खाली असलेले बॅरिगेट्स पुढे ढकलले गेले. नंदकुमार इंगळे या वादळी पावसातही वाहतूक सुरळीत राहावी म्हणून भिजत वाहतुकीला दिशा देत होते.

नंदकुमार यांना त्यांच्या या कामाचा व्हीडीओ व्हायरल झाल्याचे कळले तेव्हा ते म्हणाले की, माझ्याकडे रेनकोट घालायला वेळ नव्हता. माझं पाकीट व मोबाइल वॉर्डनला दिला व त्याला कव्हर करण्यास सांगितलं. आकुर्ली रोडवर त्यावेळी खूप गाड्या होत्या. मी तिथून कुठे गेलो असतो तर गोंधळ झाला असता.

मंगळवारी इंगळे यांचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं त्यांना समजलं. इंगळे स्वतः सोशल मीडियावर अॅक्टीव्ह नसल्याने त्यांना आधी काही समजलं नाही.