डॉ. अनिल चिव्हाणे, रवींद्र मुळे यांच्याह १७ अधिकारी-कर्मचा-यांना निरोप
नागपूर: महानगरपालिका ही येथे कार्यरत अधिकारी-कर्मचा-यांसाठी एक कुटुंबसंस्था आहे. येथे काम करणारा प्रत्येक अधिकारी-कर्मचारी हा सेवाभावनेने काम करतो. कर्तव्य जोपासताना नागरिकांना सेवा देण्याच्या भावनेतूनच प्रत्येक अधिकारी-कर्मचारी काम करतो. नागपूर महानगरपालिकेमध्ये आयुष्याचा मोठा काळ सेवा दिल्यानंतर निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचा-यांकडे एक मोठा अनुभवाचा ठेवा असतो. या अनुभवाचा व आपल्यातील कार्यक्षमतेचा लाभ पुढे समासाजासाठी व्हावा, असा आशावाद अपर आयुक्त राम जोशी यांनी व्यक्त केला.
नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, उपअभियंता आर.व्ही.मुळे यांच्यासह १७ अधिकारी-कर्मचारी यांच्या सेवानिवृत्ती निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, निगम अधीक्षक मदन सुभेदार, लेखा अधिकारी श्री. मेश्राम, बाजार अधिक्षक श्रीकांत वैद्य, प्रफुल सतदेवे, प्रवीण तंत्रपाळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अपर आयुक्त राम जोशी म्हणाले, माणसाच्या आयुष्याचे तीन टप्पे असतात. पहिला टप्पा नोकरीच्या आधीचा त्यानंतर नोकरी नंतर कौटुंबिक जबाबदारी व शेवटी निवृत्ती या संपूर्ण जीवनचक्रामध्ये अनेक जबाबदारी नोकरीतील ताण यामुळे अनेक इच्छा आकांक्षा अपूर्ण राहतात. अशा अपूर्ण इच्छा, आकांक्षा पूर्ण करताना सामाजिक भान जपले जावे. मनपा काम करताना सुरू असलेले सेवाकार्य पुढेही सुरू ठेवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सत्काराला उत्तर देताना आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेकडे आपण नेहमीच एक परिवार म्हणून बघितले. या परिवाराने २८ वर्षाच्या कार्यकाळात अनेक जिव्हाळ्याची माणसे दिली. याच माणसांमुळे येणा-या अडचणी सोडविण्याची जिद्द मिळाली. २८ वर्षापूर्वी ६ फेब्रुवारी १९९० मध्ये नोकरी लागल्याचा खूप आनंद झाला होता. आता महानगरपालिकेमध्ये सेवा दिल्यानंतर कमविलेल्या माणसांपासून दूर जात असल्याचे दु:ख होत आहे. आयुष्याच्या पुढील काळातही जनेतला सेवा देत राहू अशा शब्दात डॉ. अनिल चिव्हाणे यांनी झालेल्या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तत्पूर्वी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, उप अभियंता आर.व्ही. मुळे, शाखा अभियंता व्ही.व्ही. कहाळकर यांच्यासह १७ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप आणि धनादेश देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस यांनी केले.
कार्यक्रमाला डोमाजी भडंग, दिलीप देवगडे, दिलीप तांदळे, वंदना धनविजय, सुषमा ढोरे, सुषमा राठोड, पुष्पा गजघाटे आदी उपस्थित होते. निवृत्त झालेल्या अन्य कर्मचाऱ्यांमध्ये सहायक अधिक्षक एस.ए. धवने, सहायक अधिक्षक यू.आर. मोटघरे, राजस्व निरीक्षक एस.जी. सातपूते, कनिष्ठ लिपीक एन.ओ. घाडगे, मोहरीर डी.पी. काकडे, मोहरीर क्रिष्णा सांबरे, मीटर रिडर ए.के. अलोणे, सहायक शिक्षिका वंदना लांजेवार, सरला मोरोलिया, चपराशी शंकर शिंदे, मजदूर बबन रामेकर, गार्ड मुकेश डकाहा, वनश्री ढगे, समाज कल्याण विभाग समुह संघटक फिरोजी सुलताना यांचा समावेश आहे.