| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 6th, 2018

  ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी रिअल टाइम टेलिमेडिसीन तंत्रज्ञानाचा वापर करणार – डॉ. दीपक सावंत

  मुंबई : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळण्याकरिता तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. शहरातील विशेषज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी रिअल टाइम टेली मेडिसिन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे विचाराधीन असून त्यासाठी तज्ज्ञांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केले.

  हॉटेल ताज लँड्स येथे इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसतर्फे आयोजित ‘क्रिएटेक’ या आंतरराष्ट्रीय परिसंवादात डॉ.सावंत बोलत होते.

  आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले, ग्रामीण भागात डॉक्टरांची उपलब्धता हा चिंतेचा विषय आहे. शासनामार्फत वेळोवेळी डॉक्टर पदभरतीच्या जाहिराती दिल्या जातात. नियुक्ती झालेले डॉक्टर ग्रामीण भागात काम करण्यास फारसे उत्सुक नसतात. यामुळे ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देताना अडचणी येतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणे काळाची गरज आहे. डॉक्टरांच्या कमतरतेची पोकळी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भरून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असून त्याचाच पुढील टप्पा म्हणून ‘रिअल टाइम टेलिमेडिसीन’कडे पाहिले जात आहे.

  हे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सुरू करण्याचे स्वप्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून केवळ रुग्णाचे वैद्यकीय रिपोर्ट न पाहता, ग्रामीण भागातील रुग्णांच्या हृदयाचे ठोके मुंबईत बसलेल्या डॉक्टरला ऐकता येऊ शकेल शिवाय त्या रुग्णाचा रिअल टाइम ईसीजी काढून उपचाराची सोय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. थोडक्यात रिअल टाइम टेलिमेडिसिन ही ऑनलाईन ‘लाइव्ह’ रुग्ण तपासणी असेल आणि ज्याला भौगोलिक परिस्थितीचे बंधन नसेल. अशा या तंत्रज्ञानासाठी तज्ज्ञांनी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.

  याबरोबरच रुग्णालयातील जंतू संसर्ग नियंत्रणात आणणे. शासकीय रुग्णवाहिकांना ‘जीपीएस’ प्रणाली बसविणे, विशेष नवजात दक्षता केंद्रांचे श्रेणीवर्धन करणे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या बाईक अॅम्ब्युलन्स सेवेने प्रेरित होऊन गेल्या वर्षी मुंबईत ही सेवा सुरू केली. गेल्या सहा महिन्यात १३०० रुग्णांना जीवदान मिळाल्याचे सांगत येत्या काही महिन्यात मुंबईत अजून १० तर राज्यातील दुर्गम भागात २० बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145