Published On : Tue, Feb 6th, 2018

पुण्यातील शिवसृष्टी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

मुंबई: पुणे हे (शिवनेरी, ता.जुन्नर) छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मगाव आहे. शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्यही पुणे जिल्ह्यातच होते. यामुळे येथील नियोजित शिवसृष्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व ऐतिहासिक व्हावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शिवसृष्टी व मेट्रो हे दोन्ही प्रकल्प एकत्रित सुरू होण्यासाठी त्वरित महापालिका व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित प्रारूप आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पुण्यातील शिवसृष्टी व मेट्रोबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, नगर विकासचे प्रधान सचिव नितीन करीर, पुणे मनपा आयुक्त कुणाल कुमार, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गटनेते श्रीनाथ भिमाले, कला दिग्दर्शक नितीन देसाई, मेट्रोचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पुण्यातील शिवसृष्टी ऐतिहासिक व्हावी यासाठी मनपाने शिवसृष्टीला मदत करावी. बीडीपीच्या (जैव विविधता उद्यान) जागेबाबत किती जागा हवी, टीडीआर किती ? याचा निर्णय सर्वांना सोबत घेऊन त्वरित घ्या. जगभरातील पर्यटक शिवसृष्टी पाहण्यासाठी येणार असल्याने मेट्रोनेही शिवसृष्टी ते रामवाडी असे स्टेशन निर्माण करावे. शिवाय बीडीपीच्या आजूबाजूला झोपडपट्टी निर्माण होणार नाही, याची दक्षताही मनपाने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सूचित केले.

श्री.बापट म्हणाले, बीडीपीचा प्रश्न त्वरित सोडविण्यात येईल, मात्र यातील अंतर्गत रस्त्यांचाही विचार व्हावा. यावेळी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोचे तर मनपाच्या तयारीविषयी आयुक्त कुणाल कुमार तर शिवसृष्टीबाबत नितीन देसाई यांनी सादरीकरण केले.

काय असेल शिवसृष्टीत

• या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले व जीवनावर भर
• महाराजांच्या जीवनातील नऊ प्रसंग व स्थापत्यशास्त्र यांचा सुंदर मिलाप
• अफजलखान भेटीचे विविध प्रसंग
• एक्सप्रेस वेपासून दिसेल अशी भव्यता
• येणाऱ्या पर्यटकांना स्फूर्ती मिळेल यावर भर