– वनामती येथे कृषी दिनानिमित्त परिसंवाद, विदर्भातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांच्या संवर्धनासोबत उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन वनामतीचे संचालक रविंद्र ठाकरे यांनी केले. 1 जुलैला कृषी दिनानिमित्त वसंतराव नाईक राज्य कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (वनामती) येथे श्री. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आयोजित परिसंवादात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाला वनामतीच्या अप्पर संचालक डॉ. अर्चना कडू, उपसंचालक सुबोध मोहरील, वाशिमचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी एस.एम. तोटावर, कापूस पिकाचे मार्गदर्शक केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे वरिष्ठ वैज्ञानिक (किटकशास्त्र) डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. शैलेश गावंडे (वनस्पती रोगशास्त्र), केंद्रीय निंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.आर.के. सोनकर, डॉ. ए.के. दास, डॉ. जी.टी. बेहरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी सहयोगी प्राध्यापक डॉ. सी.यु. पाटील, कृषि संशोधन केंद्र साकोलीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शामकुंवर आदी तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.
हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांचा 1 जुलै हा जयंती दिन कृषी दिन म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त वनामती येथे आयोजित परिसंवाद कार्यक्रमात प्रारंभी स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या परिसंवादाचे थेट प्रक्षेपण ‘वनामती नागपूर’ या यूट्यूब चॅनलवरून करण्यात आले होते थेट प्रक्षेपणाद्वारे नागपूर व अमरावती विभागातील शेतकरी व शास्त्रज्ञ यांचा संवाद साधण्यात आला.
परिसंवाद सत्रात सोयाबीन पीकसंदर्भात श्री. तोटावर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी अष्टसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. प्रामुख्याने शेतकऱ्यांनी योग्य वाणाची निवड करावी, घरी तयार केलेले बियाणे वापरावे, घरी बियाणे तयार करतेवेळी बियाण्यांची स्पायरल सेपरेटरद्वारे योग्य प्रतवारी करून गुणवत्तापूर्ण बियाणेच वापरावे, असे मार्गदर्शन केले. इतर बियाणे वापरते वेळी दहा वर्षाच्या आतील प्रसारित झालेले बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी उगवण क्षमता चाचणी करावी तसेच रासायनिक व जैविक बीज प्रक्रिया करावी. बियाणाचे उगवणीसाठी व पिकाच्या पुढील वाढीसाठी बियाणे 3 ते 5 सेंटीमीटरपर्यंत खोल पेरावे. जमिनीच्या मगदूराप्रमाणे व मातीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणानुसार शिफारसीतील खते देण्यात यावी, असे श्री तोटावर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या दरम्यान डॉ. सी.यु. पाटील यांनी ऑनलाईन पद्धतीद्वारे सोयाबीन पीक व्यवस्थापनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कपाशी पिकासंदर्भात वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. बाबासाहेब फंड व डॉ. शैलेश गावंडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा ५-१० ग्रॅम प्रति किलो अथवा कार्बोक्झिन (विटावॅक्स) ३ ग्राम प्रति किलो बियाण्यास चोळावे. कपाशीची पेरणी झाली असल्यास सुरुवातीच्या १ महिन्यापर्यंत रोपावस्थेतील कपाशीला मूळकूज आणि मर रोग नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशी ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी अथवा बाविस्टीन (कार्बेन्डाझिम) ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी/ ड्रेंचिंग करावी. कपाशी पीक ६० दिवसांचे होईपर्यंत कोणत्याही रासायनिक कीटनाशकांचा वापर करू नये. ४५ -६० दिवसांपर्यंत रस शोषण करणाऱ्या किडी आणि गुलाबी बोंडअळी, पतंग यांना अंडी घालण्यापासून रोखण्यासाठी निंबोळी अर्क ५ टक्के (५० मिली प्रति लिटर पाणी) अथवा नीम तेल ५ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे प्रतिबंधात्मक फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा फळगळीची समस्या याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करताना शिफारस केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा अवलंब करणेबाबत मार्गदर्शक शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. संत्रा फळ पिकामध्ये फळगळ, डिंक्या, सिट्रस ग्रीनिंग, फळमाशी इ. कीड व रोगांच्या नियंत्रणाबाबत केंद्रीय निंबुवर्गीय फळ संशोधन संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ.आर.के. सोनकर, डॉ. ए.के. दास, व डॉ. जी.टी. बेहरे आदींनी मार्गदर्शन केले. प्रगतीशील संत्रा उत्पादक दादाराव काळे यांनी संत्रा पिकासाठी यांनी त्याच्या प्रक्षेत्रावरील संत्रा बागेचे काटेकोर व्यवस्थापन याबाबत अनुभव कथन केले व शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आवाहन केले.
भात उत्पादक वडसा (जि. गडचिरोली) येथील शेतकरी गोपाल बोरकर यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करतांना जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड, उत्पादित भाताचे शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत विक्री, ज्यादा बाजारभाव कसा मिळवावा आदींबाबत वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. शामकुवर यांनी मार्गदर्शन केले.
या पीक परिसंवादामध्ये सोयाबीन पीक उत्पादक शेतकरी दहेगावचे (वर्धा) रवींद्र अंभोरे, भिवापूरचे जवस उत्पादक शेतकरी डॉ. नारायण लांबट देखील सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. मोहरील यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.