Published On : Mon, Nov 19th, 2018

धक्कादायक! नागपुरात यूपीएससीची प्रश्नपत्रिका फुटली

Advertisement

नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाची(यूपीएससी) परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आलेल्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणीने मोबाईलवरून तिच्या मित्राला केंद्राबाहेर प्रश्नपत्रिका पाठवली. परिक्षा केंद्रात मोबाईल नेण्यासाठी तिने पाण्याच्या बाटलीचा उपयोग केला होता. मात्र, तिची बनवाबनवी अखेर उघड झाली अन केंद्र प्रमुखाने तिला रंगेहात पकडले. रेशीमबागमधील जामदार हायस्कूलच्या परिक्षा केंद्रावर रविवारी दुपारी घडलेल्या या बनवानबवीच्या प्रकाराने काही वेळेसाठी संबंधितात खळबळ उडवून दिली होती.

अश्विनी जनार्दन सरोदे (वय २३) असे यूपीएससीचा पेपर लिक करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. ती अमरावती जिल्ह्यातील अंजनवती (ता. धामणगाव रेल्वे) येथील रहिवासी आहे. तर, शुभम भास्करराव मुंदाने (वय २५) असे तिच्या साथीदाराचे नाव असून, तो कोहळे लेआऊट, खडगाव मार्ग वाडी येथील रहिवासी आहे.

रविवारी यूपीएससीचा पेपर होता. नागपुरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेशिमबागेतील जामदार हायस्कूलमध्ये त्याचे परिक्षा केंद्र होते. अश्विनी ही परिक्षा देण्यासाठी केंद्रात गेली. केंद्रात परिक्षार्थ्यांना मोबाईल नेण्यास बंदी असल्याचे पाहून अश्विनीने पाण्याच्या बाटलीत मोबाईल लपवून नेला. दुपारी १२ च्या सुमारास तिने आपला मोबाईल सुरू करून प्रश्नपत्रिकेची फोटो कॉपी काढली. तिने ही कॉपी केंद्राबाहेर असलेला तिचा साथीदार शुभम भास्करराव मुंदाने (वय २५, रा. कोहळे लेआऊट, खडगाव मार्ग वाडी) याच्या मोबाईलवर पाठवली.

परिक्षा केंद्रावरच्या कॅमे-यातून अश्विनीचे संशयास्पद वर्तन टिपले गेले. त्यामुळे केंद्र प्रमुखाने तिची महिला कर्मचाºयाच्या मदतीने झडती घेतली असता तिच्याजवळ मोबाईल आढळला. तिने मोबाईल हाताळून मित्राला प्रश्नपत्रिका पाठवली अन तिचा मित्र शुभमने तिला प्रश्नांची उत्तरे पाठवल्याचेही प्राथमिक चौकशीत उघड झाले. या प्रकारामुळे संबंधितांमध्ये काही वेळेसाठी प्रचंड खळबळ निर्माण झाली.

या संबंधाने वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर विनय दत्तात्रय निमगावकर (वय ५१, रा. समर्थ नगरी, सोनेगाव) यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अश्विनी तसेच शुभम विरुद्ध फसवणुकीचे कलम ४२०, ४१७, ३४ तसेच सहकलम ४३, ६६ आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला. शुभमला अटक करण्यात आली आहे.