Published On : Mon, Nov 19th, 2018

नागपुरातील झिरो सिस्टीम उद्योग; आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील खास आकर्षण

Advertisement

नवी दिल्ली : नागपूर येथील झिरो सिस्टीम हा महिलांनी चालविलेला व आपली वेगळी ओळख निर्माण करणारा एलईडी लाईटस्‍ निर्मिती उद्योगाचा स्टॉल आंतरराष्ट्रीय भारतीय व्यापार मेळयातील महाराष्ट्र दालनात देशी- विदेशी ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या इंटरनॅशनल ट्रेड प्रमोशन ऑर्गनायजेशनच्यावतीने प्रगती मैदान येथे ३८ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. “ग्रामीण भारतातील उद्योग”या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या मेळ्यात भारतातील विविध राज्य आणि परदेशातील उद्योजकांनी स्टॉल्स थाटले आहेत. महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्यावतीने ” महाराष्ट्रातील ग्रामीण उद्योग” हे राज्याच्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीचे दर्शन घडविणारे सुरेख प्रदर्शन साकारण्यात आले आहे. या दालनात एकूण १४ स्टॉल्स असून दालनाच्या प्रवेशास असणारे नागपूर येथील झिरो सिस्टीम उद्योगाचा वैशिष्टयपूर्ण स्टॉल येथे भेट देणा-यांचे खास आकर्षण ठरत आहे.

Advertisement
Advertisement

या स्टॉलवर डोमेस्टीक आणि कमर्सियल अशा प्रकारातील डाऊन लाईट, स्टुडिओ लाईट, टू बाय टू, फ्लड लाईट, स्ट्रीट लाईट, वेल ग्लास आणि कन्फाईन स्पेस लाईट्स आदिंचे मॉडेल, चित्र आणि सादरीकरण दिसून येते. उद्योग समुहाच्या व्यवस्थापकीय संचालक रश्मी कुलकर्णी सांगतात, नागपुरातील नरेंद्र नगर भागात त्यांच्या सासुबाई सुहास कुलकर्णी यांनी १९८३ मध्ये हा उद्योग थाटला. उद्योगाची संपूर्ण मालकी महिलांची आणि उद्योगात कार्यरत ८० टक्के महिला तंत्रज्ञ, अधिकारी –कर्मचारी हे झिरो सिस्टीम उद्योगाचे खास वैशिष्टय व बलस्थान असल्याचे त्या सांगातात. या सर्व महिलांनी इलेक्ट्रॉनिक्स मधून अभियांत्रिकी पदवी, डिप्लोमा आणि आयटीआय शिक्षण पूर्ण केले आहे. महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेवून कामाच्या ठिकाणी सुरक्षीतता पुरविण्यात आली आहे. उत्पादन विभागात सुरक्षित उपकरणे लावण्यात आली असून सकाळी ९ ते सायंकाळी ६ अशी महिलांच्या कामाची वेळ ठरवून देण्यात आली असून याचे कसोसीने पालन केले जाते.

लाईट्सच डिझाईन आणि निर्मिती करिता लागणारे तंत्रज्ञान स्वत: या उद्योगातील महिलाच विकसीत करतात. तर लाईट्स बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल आंध्रप्रदेश, दिल्ली आणि गुजरातमधून आणला जातो. या उद्योगाची स्वत:ची निर्मिती यंत्रणा असून त्यात डिझाईनींग, असेंब्लींग, टेस्टींग, प्रोडक्शन आणि सप्लाय असे विभाग आहेत. या उद्योगाचे स्वतंत्र व सुसज्ज गोदाम आहे. १४ वॅटपासून १००० वॅट क्षमतेच्या लाईट्सची निर्मिती या ठिकाणी होत असून विदर्भातील सर्व जिल्हयांसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये लाईट्स पुरविले जातात. यासोबतच परदेशातही या उद्योगाच्या मालाला मागणी आहे. अमेरिका आणि मध्य आशियामध्ये हा माल पाठविण्यात येतो.
अनोख्या बलुन लाईटची निर्मिती

या उद्योगातील महिलांना नाविन्याचा सतत ध्यास असतो. सतत निरीक्षण व संशोधनातून या उद्योगाने नुकतेच बलुन लाईटची निर्मिती केली आहे. फुग्याच्या आकारातील कापडी आवरणात बसविण्यात आलेला व ३६० अंशात सभोवताली फिरू शकणारा ५०० वॅटचा बलून लाईट म्हणजे या उद्योगाची अनोखी कलाकृतीच ठरली आहे. भारतात हा पहिलाच प्रयोग असल्याचे या उद्योगाच्या व्यवस्थापकीय संचालक रश्मी कुलकर्णी सांगतात. या बलुन लाईटला भारतात व परदेशात मोठया प्रमाणात मागणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मॅग्नेटीक महाराष्ट्र प्रदर्शनात द्वितीय पुरस्कार
महाराष्ट्र शासनाच्यावतीने मागील वर्षी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मॅग्नेटीक महाराष्ट्र या उद्योग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झिरो सिस्टीम उद्योग समुहाला सर्वोत्तम महिला उद्योगाचा दुस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement