Published On : Wed, Dec 11th, 2019

स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या सूचनांप्रमाणे आगामी शासकीय भरती परीक्षा घ्याव्यात

विशाल मुत्तेमवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर : राज्यातील लाखो युवक-युवतींच्या भविष्याचा विचार करून दोषपूर्ण असणाऱ्या महापरीक्षा पोर्टलवरील आगामी परीक्षांना स्थगिती दिल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव विशाल मुत्तेमवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. गेल्या चार वर्षांपासून महाभरतीची घोषणा करण्यात आली. परंतु, परीक्षेतील गैरप्रकारामुळे अजूनपर्यंत विविध विभागांतील रिक्त पदे भरायची आहेत. एकीकडे हजारो युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे लवकरात लवकर परीक्षा पद्धतीतील त्रुटी दूर करून युवक-युवतींना न्याय देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

शहरासह गावखेड्यांतील उमेदवार स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेतात. मात्र, शासकीय भरती प्रक्रिया सदोष असल्यास त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरते. असाच प्रकार २०१७ पासून महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून घडत गेला. मात्र, याविरोधात राज्यभर आंदोलने करूनही तरुणांच्या मागणीकडे तत्कालीन राज्य सरकारने दुर्लक्ष केले. परंतु, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांच्या समस्येची तातडीने दखल घेतल्याबद्दल मुत्तेमवार यांनी समाधान व्यक्त केले.

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर करून लवकरच नव्याने परीक्षा घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शासकीय भरती परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यापूर्वी स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या सूचना व मत जाणून घ्यावे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक व निर्दोष परीक्षा प्रणाली राबविणे शक्य झाल्यास त्याबाबत पुढाकार घ्यावा. याकरिता तांत्रिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अनुभव मार्गदर्शक ठरू शकतात. परीक्षार्थ्यांना सर्व भरती परीक्षा ऑफलाईन हव्या असल्यास याबाबतही विचार करण्यात यावा. कारण, परीक्षा पद्धतीतून मेहनती आणि प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळणे महत्त्वाचे आहे. गुणवत्ता व पात्रताधारक उमेदवारांचीच योग्य पदासाठी निवड व्हावी, अशा प्रकारची निर्दोष निवड प्रणाली विकसित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.