Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 22nd, 2020

  अमेरिकन गुंतवणूकदारांनी सध्या भारतात गुंतवणूक करावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आवाहन

  युएस बिझनेस कौन्सिल, युएस चेंबर ऑफ कॉमर्सशी संवाद

  नागपूर: भारताच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी अमेरिकन गुंतवणूकदारांना सुवर्णसंधी असून भारत हा गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय असल्याने या गुंवतणूकदारांना भारतात गुंतवणूक करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  युएस बिझनेस कौन्सिल व युएस चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित 45 व्या वार्षिक सभेत ना. गडकरी व्हिडिओ कॉन्सरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते.

  भारतातील सर्व क्षेत्रात गुंतवणुकीच्या खूप क्षमता आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही गतीने विकसित अर्थव्यवस्था असल्यामुळे व येथील विविध क्षेत्रात गुंतवणूक केल्यास त्याचा अपेक्षित परतावा गुंतवणूकदारांना मिळू शकतो, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- अर्थव्यवस्थेत खेळते भांडवल येणे महत्त्वाचे आहे. आज भारतात कौशल्य असलेले मनुष्यबळ आहे, अद्ययावत तंत्रज्ञान आहे, नवीन संशोधन आहे, मोठी बाजार व्यवस्था आहे, अशा स्थितीत देशातील कोणतेही क्षेत्र गुंतवणुकीसाठी अमेरिकन गुंतवणूकदारांनी निवडले तरीही ते फायद्यात राहतील. अधिक रोजगार निर्मिती व गरिबी हटविण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये देशाला गुंतवणुकीची गरज आहे, असेही ते म्हणाले.

  एमएसएमईची व्याख्या आम्ही बदलली. केंद्र शासनाचा हा ऐतिहासिक निर्णय असून या निर्णयाचा सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांना निश्चितपणे फायदा होणार आहे. फंड्स ऑफ फंड्सच्या माध्यमातून बँक रेकॉर्ड, जीएसटी, आयकर या संदर्भात ज्या उद्योगांचे रेकॉर्ड चांगले आहेत, अशा उद्योगांचे आम्ही रेटिंग करून त्यांना 15 कोटीचे भांडवल देऊ. ते उद्योग नंतर भांडवली बाजारात भांडवल उभे करू शकतील. सध्याची भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता हे उद्योग परकीय गुंतवणूक आपल्या उद्योगात आणण्यात यशस्वी होतील असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला.

  राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही ट्रिपल ए रेटिंगची संस्था असून रस्ते बांधणीसाठी आम्हाला निधीची कमतरता नाही, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- दररोज 2 किमी ऐवजी 30 किमी रस्त्यांचे बांधकाम आम्ही करीत आहोत. 22 राष्ट्रीय हरित मार्ग, मुंबई दिल्ली हरित महामार्ग, दिल्ली, अमृतसर कटरा असे अनेक महामार्ग आम्ही तयार करीत आहोत. या सर्व कामांमध्ये परकीय गुंतवणूक आम्ही घेत आहोत. त्यामुळे निधीची कमतरता आमच्याकडे नाही. दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. आदिवासी क्षेत्रातून या मार्गाचा आराखडा तयार केल्यामुळे 16 हजार कोटींची बचत झाली आहे. येत्या 3 वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल, असेही ते म्हणाले.

  सागरमाला या प्रकल्पाबाबतची माहिती ना. गडकरी यांनी यावेळी सांगितली. ते पुढे म्हणाले- जलवाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतूक आहे. एलएनजी, इथेनॉल या जैविक इंधनामुळे जलवाहतूक क्षेत्रातही वाहतूक खर्चात बचत होईल. या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी खूप क्षमता आहे. क्रूझ पर्यटनाचे उदाहरण देऊन या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, असे मत व्यक्त करून ते म्हणाले- आम्ही आर्थिक युध्दाचा सामना करीत आहोत. पण अशी अनेक संकटे आम्ही आतापर्यंत पाहिली आहेत. सर्व संकटांचा सामना आम्ही केला आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करणे आवश्यक आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145