Published On : Wed, Jul 22nd, 2020

भुकेसाठी कुली आंदोलनाच्या तयारीत!

Advertisement

केवळ ३० लोकांच्या हातालाच काम
– कसे जगतील अन् कुटुंबाला जगवतील?


नागपुर – रेल्वे गाडीची चाके म्हणजे गाडीचा कणाच म्हणता येईल. एका चाकात क्षुल्लक बिघाड असला तरी गाडी पुढे जाऊ शकणार नाही. अगदी त्याचप्रमाणे प्रवासी हे कुलींसाठी श्वास आहेत. त्यांच्या ओझ्यावरच कुलींची चूल पेटते आणि दोन घास मुलांच्या पोटात जातात. गाड्याच चालल्या नाही तर… त्याही पलीकडे विचार केल्यास प्रवासीच आले नाही तर… कुलींची जीवनगाडी थांबेल. अशीच काहीशी स्थिती नागपूर रेल्वेस्थानकावरील कुलींची झाली आहे. आता असे किती दिवस काढणार? पोटाच्या आगीसमोर कोणाचे काहीच चालत नाही. त्यामुळे भुकेसाठी ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर जवळपास १५० कुली आहेत. प्रत्यक्षात १४५ कामावर असतात. कधीकाळी ही संख्या अडीचशेच्या वर होती. तरी सुद्धा प्रत्येकाच्या हाताला काम मिळायचे. आता कुलींची संख्या कमी असली तरी पोटभर मिळत नाही. चाके असलेली बॅग आल्यापासून कुलींच्या कामावर परिणाम झाला. त्यात भर म्हणून बॅटरीवर चालणारी कार आली. या दोन्ही साधनांमुळे प्रवाशांचे काम सहज झाले आणि पोट भरेल एवढे कामही कुलींच्या हाताला मिळत नाही.

मार्च २०२० मध्ये जागतिक महामारी आली. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर देशव्यापी टाळेबंदी करण्यात आली. शहरात संचारबदी लागू करण्यात आली. त्यामुळे कंपन्या, प्रतिष्ठाने, कार्यालये सर्वच बंद. रेल्वेची प्रवासी सेवाही बंद. केवळ पार्सल आणि मालगाड्याच सुरू होत्या. आता हातालाच काम नसल्याने राजस्थान आणि बिहार राज्यातील जवळपास १०० कुली आपापल्या गावी निघून गेले. जवळपास ५० कुली स्थानिक आहेत. त्यांना रेल्वे प्रशासनाने काही दिवस अन्न धान्य पुरविले.

आता जुलैपासून प्रवासी गाड्यांना सुरुवात झाली. मात्र, मोजक्याच गाड्या आणि नियमाला धरून चालत आहेत. त्यातही नागपूर रेल्वेस्थानकावर थांबणाèया गाड्यांची संख्या १८ आहे. यातही काही गाड्या आठवडी आहेत. एक दिवसाआड कुली कामावर येतात. अशा स्थितीत स्थानिक ५० कुलींचे पोट भरू शकत नाही. अशी स्थिती कधीपर्यंत? परराज्यातील कुली कधीपर्यंत घरी थांबून राहतील? ते सर्व लोक परतण्याच्या तयारीत आहेत. सर्व कुली आले तर पोट कसे भरतील? आता कुलींनी जगावे कसे? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

सर्वांना काम देण्याचा प्रयत्न
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १८ गाड्या थांबतात. सर्व कुलींच्या हाताला काम मिळाले म्हणून रेल्वे प्रशासनाने रोटेशन पद्धत सुरू केली आहे. यासोबतचा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कुलींना नियमित अन्नधान्य वाटप केले जात आहे, असे सहायक वाणिज्य व्यवस्थापक एस.जी. राव यांनी सांगितले.

कुलींना पार्सल कार्यालयात काम द्यावे
नागपूर रेल्वेस्थानकावर कुलींची संख्या १४५ च्या जवळपास आहे. परराज्यातील जवळपास १०० कुली आहेत. सध्या स्थानिक कुलींच्या हाताला काम नाही. अशा स्थितीत बाहेरगावाहूून कुली आल्यास काय होईल? पोट भरत नसल्याने आंदोलनाशिवाय पर्याय नाही. रेल्वे मंत्रालयाने कुलींसाठी आर्थिक मदत द्यावी, तसेच रेल्वे गाड्या पूर्ण क्षमतेने चालत नाहीत तोपर्यंत कुलींना पार्सल कार्यालयात काम द्यावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मध्य रेल्वे भार वाहक संघाचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांनी दिला.