Published On : Sat, Sep 7th, 2019

विदर्भातील शेतक-यांच्या संत्रा व दूध यांना संत्रा बर्फीमूळे चांगली बाजारपेठ उपलब्ध होईल

Advertisement

.

नागपूर : राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एन.डी.डी.बी )नागपूरस्थित मदर डेअरीतर्फे संत्रा मावा बर्फीचे उत्पादन सुरु झाल्याने विदर्भातील शेतक-यांच्या संत्रा व दूध या उत्पादनाला चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग जहाज बांधणी मंत्री तसेच केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरात दिली . स्थानिक वनामती सभागृहात विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प व एन.डी.डी.बी. , मूफार्म यांच्यात राशन बॅलेसिंग अ‍ॅडव्हायझरी प्रोग्राम व व्हाईट टेक अ‍ॅप्लीकेशनच्या संदर्भात त्रिपक्षीय कराराच्या देवाण-घेवाणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते . याप्रसंगी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव अनूप कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या थांबण्यासाठी शेतक-यांनी दुग्धव्यवसाय, मध-निर्मिती, मत्स्यशेती अशा शेतीपूरक व्यवसायांकडेही वळणे आवश्यक आहे. जनावरांना संतुलित आहार,पशुखाद्य यांची उपलब्धता यावर दुग्धउत्पादन अवंलबून असते. यामुळे नॅपीअर ग्रास यासारख्या उच्च कॅलरीमूल्य असण-या पशुखाद्यांची लागवड शेतक-यांनी करावी , असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले . संत्रा बर्फीचे स्टॉल्स विमानतळावर लावल्यास 2 हजार किलो संत्रा बर्फी विक्री होऊ शकेल. वर्धा येथे गाईचे दूध, तूप आणि मध यापासून निर्मित गोरस-पाक बिस्किटाध्ये इतरही स्वाद उपलब्ध केल्यास वर्धा जिल्ह्यातील दूध व मध यांचा वापर जिल्ह्यातच होऊन शेतक–यांना लाभ होईल.विदर्भात सुमारे सहा हजार मालगुजारी तलाव असून त्यातील गोड्या पाण्यात कोळंबी व मासे उत्पादन घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करता येतील, असे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.

शेतक-यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग प्रयत्नशील आहे, मूर फार्मतर्फे विदर्भाच्या वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यात राबविल्या जाणारा दुग्धविकास प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभरातही व्हावा, अशी सूचना राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केली.

राशन बॅलेसिंग अ‍ॅडव्हायझरी प्रोग्राम अंतर्गत दुग्धउत्पादनात वृद्‌धी व खर्च कपात होण्यास दुभत्या जनावरांना द्यावयाचा संतुलित आहार व पशुखाद्यांची माहिती दुग्धउत्पादकांना दिली जाते. या प्रोग्राम अंतर्गत फुड व फॉडर डाटा संकलित केला जात असल्याने दुग्धउत्पादकांना प्रती जनावर 25 रुपये खर्च कमी येतो,अशी माहिती विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे संचालक रविंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविकातून दिली.

 

व्हाईट टेक अ‍ॅप्लीकेशनच्या अंतर्गत मूफार्मस्‌ तर्फे कृषी उद्योग व विस्तारीकरण यासंदर्भात देशभरात पथदर्शी प्रकल्प राबविले जातात. विदर्भाच्या वर्धा, अमरावती व नागपूर जिल्ह्यात हे प्रकल्प राबविल्या जात असल्याचे मूफार्मच्या आशना सिंग यांनी सांगितले.

या कार्यक्रमानंतर पशुसंवर्धन विकास अधिका-यांच्या प्रशिक्षण वर्गाचेही आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग, एन,डी.डी.बी. चे अधिकारी, राज्याच्या विविध भागातून आलेले पशुसंवर्धन विकास अधिकारी उपस्थित होते.