Published On : Fri, Jul 5th, 2019

ख-या अर्थाने महिलांना सक्षम करणारा अर्थसंकल्प : महापौर नंदा जिचकार

Advertisement

देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, शिक्षण, आरोग्य, जलशक्ती या क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण तरतूदींसह महिलांसाठीही महत्त्वाच्या घोषणा केल्या.

महिला सक्षमीकरणासाठी अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या परावलंबी महिल्यांच्या सबलीकरणासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करून त्यामार्फत महिलांचे प्रश्न, स्त्री-सक्षमीकरण, स्त्री-सबलीकरण या मुद्द्यांवर भर देणे यासोबतच मुद्रा योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना एक लाख रुपयांचे कर्ज देणे तसेच महिला बचतगटांमध्ये, गृहउद्योगांमध्ये काम करणाऱ्या महिलांचे जनधन खाते असल्यास त्या खात्याला ५००० रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधा मिळणार आहे. या सुविधेअंतर्गत पाच हजार रुपये लवकरच जनधन खात्यात जमा करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. देशातील शेवटच्या घटकातील महिलेला विचारात ठेवून ख-या अर्थाने महिलांना सक्षम करणारा अर्थसंकल्प आहे.