Published On : Mon, Jun 10th, 2019

शिक्षकांना एसजीएसपी योजनेंतर्गत लाभ द्या

कन्हान : – नॅशनल बॅंकेच्या धर्तीवर युनियन बँकेच्या पगारदार खातेधारकांना एसजीएसपी योजनेंतर्गत लाभ देण्याची प्रमुख मागणी विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाने युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आज (ता ७) झालेल्या चर्चेत केली.विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे युनियन बँकेसोबत शिक्षकां च्या विविध प्रलंबित समस्यासंदर्भात धंतोली कार्यालयात बैठक झाली.

शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत युनियन बँकेचे उपक्षेत्र प्रमुख अरविंद कुमार, मुख्य प्रबंधक नरेंद्र सम्यक (भाजीखाये) उपस्थित होते. यावेळी युनियन बँकेच्या पगारदार खातेधारकांना एसजीएसपी (State Government Salary Package Scheme) अंतर्गत समाविष्ट करण्यात यावे जेणेकरून कर्मचार्‍यांचे अपघाती निधन झाल्यास कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत मिळेल. तसेच ओडीची (Over Draft) मर्यादा १५ लाख रुपये व व्याजदर १० टक्के करण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या चर्चेत जुलै महिन्याच्या अखेरीस पगारदार खातेधारकांना एसजीएसपी योजनेंतर्गत संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपक्षेत्र प्रमुख अरविंद कुमार यांनी सांगितले.

या बैठकीतच ओडीची मर्यादा १५ लाख रुपये मंजूर करण्यात आली तसेच व्याजदर १०.५० ते ११ टक्के पर्यंत मंजूर करण्याचे जाहीर करण्यात आले. या बैठकीला शिक्षक नेते मिलिंद वानखेडे, युनियन बँकेचे उपक्षेत्र प्रबंधक अरविंद कुमार, मुख्य व्यवस्थापक नरेंद्र सम्यक (भाजीखाये), नागपूर विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक शहर संघटक राजू हारगुडे, शहर संघटक समिर काळे, शिक्षकेत्तर संघटक मनीष जुन्नरकर, माध्यमिक महिला संघटक पुष्पा बढिये, राज्य खासगी प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष महेश गिरी, मोहन तेलरांधे, युनियन बँकेचे प्रबंधक मकरंद फडणवीस, प्रबंधक सत्यप्रकाश सिंग, प्रबंधक निरज नाईक यांच्या सह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदार उपस्थित होते.


धकाधकीच्या जीवनात एसजीएस पीचा लाभ आवश्यक
सध्या धकाधकीचे जीवन असून यात कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंबियांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत या योजनेत समाविष्ट झाल्यास जवळपास २५ लाख रुपयांची मदत मिळू शकते. यासाठी संघटना अंतिम निर्णयापर्यंत लढेल.
मिलिंद वानखेडे शिक्षक नेते
संस्थापक अध्यक्ष – विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

ओडीची मर्यादा १५ लाख रुपये मंजूर

शिक्षकांच्या वाढत्या गरजा व वेतन लक्षात घेता ओडीची मर्यादा १५ लाख रुपये मंजूर करण्यात आली आहे. तसेच एसजीएसपी वर सुद्धा लवकरच धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात येईल. – अरविंद कुमार उपक्षेत्र प्रबंधक
युनियन बँक, नागपूर.