Published On : Mon, Jun 10th, 2019

बाईक रॅलीद्वारे केली हिवताप प्रतिरोध जनजागृती

महिनाभर ‘एक दिवस एक कार्यक्रम’

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे शासनाच्या हिवताप प्रतिरोध महिना जून कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी (ता.७) गांधीबाग झोनमध्ये बाईक रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. हत्तीरोग मुख्यालयातून सुरू झालेल्या बाईक रॅलीला आमदार विकास कुंभारे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. यावेळी मनपाचे आरोग्य समिती सभापती मनोज चापले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बहिरवार, गांधीबाग झोनचे झोनल अधिकारी सुरेश खरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे आदी उपस्थित होते.

शासनाच्या हिवताप प्रतिरोध महिना जून कार्यक्रमांतर्गत ‘एक दिवस एक कार्यक्रम’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण जून महिनाभर दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे शुक्रवारी (ता.७) गांधीबाग झोनमध्ये बाईक रॅली काढून हिवतापासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. मागील वर्षी डेंग्यू रुग्णांमध्ये गांधीबाग झोनमधील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे जनतेमध्ये किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने या भागाकडे विभागातर्फे विशेष लक्ष देत बाईक रॅली काढण्यात आली


रॅलीपूर्वी आमदार विकास कुंभारे यांनी सर्व उपपथकातील ३०० कर्मचा-यांना किटकजन्य आजाराबाबच्या सुरक्षेबाबत प्रतिज्ञा दिली. यावेळी किटकजन्य आजाराबाबत नारेही लावण्यात आले. यानंतर आमदार विकास कुंभारे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी बाईक रॅली काढण्यात आलेल्या भागात हस्तपत्रिका, स्टीकर, पोस्टर आदींचे वितरण करून नागरिकांना हिवतापविषयक माहिती देण्यात आली.

हत्तीरोग मुख्यालयातून सुरू झालेली बाईक रॅली टिळक पुतळा, अशोक चौक, रेशीमबाग, जगनाडे चौक, बजरंगनगर, कुंभारीटोला, बगडगंज, दिघोरिकर चौक, माटे चौक, बाबानानक नगर, स्वीपर कॉलनी, कुष्ठरोग वस्ती, जुनी मंगळवारी, गांडलेवाडा, जयसाववाडी, छापरूनगर, लकडगंज झोन कार्यालय, लकडगंज उद्यान, क्वेटा कॉलनी, पाटीदार भवन, लोहा मार्केट रामपेठ, सिटी पोस्ट ऑफीस, गांजाखेत, गोळीबार चौक, पाचपावली रेल्वे फाटक, फुटबॉल मैदान, मोतीबाग पूल, मोमीनपूरा पूल, दोसर भवन, राम मंदिर, संत्रा मार्केट, बजेरीया चौक, हज हाउस, गांधीपुतळा गंजीपेठ, चित्रा टॉकीज, जलालपुरा पोलिस चौकी, राजेंद्र शाळा, तुळशीबाग रोड, मानिपुरा चौक, शिवाजीनगर, भुतेश्वरनगर, लाकडी पूल, बडकस चौक मार्गे हत्तीरोग मुख्यालयात येत रॅलीचा समारोप झाला.