Published On : Mon, Jun 18th, 2018

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय पुस्तके

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा २६ जून पासून सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच २६ जूनला विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तक देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली आहे.

सोमवार (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात शिक्षण समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला समिती उपसभापती भारती बुंडे, सदस्या रिता मुळे, स्वाती आखतकर, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, मो.इब्राहिम तौफिक अहमद, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना विद्यार्थ्यांच्या गणवेशाची व शालेय पुस्तकाची प्रक्रिया कुठवर आली, याचा आढावा सभापती दिलीप दिवे यांनी घेतला. इयत्ता १ ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येईल, यासंबंधीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. २६ जूनपासून शाळा सुरू होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात यावा, स्थानिक आमदारांना, महापौर, उपमहापौर, पदाधिकारी, झोन सभापती, विषय समिती सभापती यांच्याद्वारे विविध शाळेत प्रवेशोत्सव साजरा करण्यात यावा, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना सायकल बँक योजनेअंतर्गत दहा लक्ष रूपयांच्या सायकली वितरित करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या स्थितीत २६० विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले आहे. दर वर्षीच्या अर्थसंकल्पात दहा लक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळेपासून दूर राहणाऱ्या आणि घराजवळ बसेसची सोय नसलेल्या विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा सभापती दिलीप दिवे यांनी केली. नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्याच्या तयारीचा आढावा सभापतींनी यावेळी घेतला. महापालिकेच्या ३७ शाळेत बायोमॅट्रिक सिस्टीम लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या महिन्याअखेर बायोमॅट्रिक प्रणाली लागू करण्यात येणार आहे. मनपाच्या सर्व १५२ शिक्षकांनी डिजीटल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यावर्षीपासून मनपाच्या विद्यार्थ्यांना डिजीटल प्रशिक्षण पद्धतीने शिकविण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बैठकीत मांडण्यात आला. यावर बोलताना सभापती दिलीप दिवे म्हणाले, स्थायी समितीने या विषयाला मंजुरी दिली तर शिक्षण समिती या प्रस्तावाला मंजुरी देईल, अशी अट सभापतींनी घातली. मनपाच्या २८ शाळांपैकी ११ शाळा ह्या विनाअनुदानीत आहेत. त्या अनुदानीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. सदर विषयासाठी शिक्षण समिती मंजुरी प्रदान करीत असल्याची घोषणा सभापती दिलीप दिवे यांनी केली.

शाळेतील मैदाने हे विकसित करण्याचे आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव मुख्याधापकांमार्फत संबंधित झोन सहायक आयुक्तांकडे पाठविण्यात यावे. यामध्ये शाळा निरिक्षकांनी विशेष लक्ष देण्यात यावे, असे निर्देश सभापतींनी दिले. यावेळी अक्षय पात्र योजनेचा आढावा सभापतींनी घेतला.