Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jun 18th, 2018

  अंबाझरी उद्यानात ‘ऑक्सिजन सेंटर’ तयार व्हावे : अविनाश पांडे

  नागपूर: अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी खासदार निधीतून सौंदर्यीकरण करण्यात आले. भविष्यात अंबाझरी उद्यानातील तलावाच्या काठावर मोकळ्या जागेत अधिकाधिक वृक्ष लावण्यात यावे. शुद्ध प्राणवायू घ्यायचा असेल तर लोकांनी अंबाझरी उद्यानात यावे, अशी आपली संकल्पना आहे. भविष्यात नागपूर महानगरपालिकेने नगरसेवकांच्या निधीच्या सहाय्याने येथे अशा प्रकारचे ‘ऑक्सिजन सेंटर’ तयार करावे, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी सदस्य अविनाश पांडे यांनी केले.

  नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित आद्य क्रांतिगुरु लहुजी साळवे अंबाझरी उद्यानात सुमारे एक कोटी रुपयांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण कार्याच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोनचे सभापती प्रमोद कौरती, मनपातील भाजपच्या उपनेत्या वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक अमर बागडे, किशोर जिचकार, सुनील हिरणवार, नगरसेविका परिणिता फुके, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, सेवानिवृत्त उद्यान अधीक्षक संजय माटे उपस्थित होते.

  पुढे बोलताना माजी खासदार अविनाश पांडे म्हणाले, शहरात अतिशय सुंदर उद्यान आणि तलाव आहे. याठिकाणी अधिकाधिक प्रमाणात वृक्षारोपण केल्यास हरित शहर बनण्यास मदत होईल. या कार्यात कुठल्याही प्रकारचे राजकारण यायला नको. आपल्या खासदारकीच्या काळात एकट्या महानगरपालिकेला विविध विकास कार्यासाठी ११ कोटी निधी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यातील एक कोटीचा निधी हा अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन जीम, स्थापत्यविषयक कामे, लहान मुलांसाठी खेळणी, फूल उद्यान, हायमास्ट लाईट आदी कामासाठी हा निधी खर्च करण्यात आला.

  आता यापुढे प्रत्येक नगरसेवकांच्या निधीतील काही रक्कम अंबाझरीच्या सौंदर्यीकरणासाठी आणि अधिकाधिक वृक्ष लावण्यासाठी देण्यात यावी जेणेकरून मनपा या उद्यानाला अधिक चांगले बनवू शकेल असे त्यांनी सांगितले. अंबाझरी तलाव आणि उद्यानाला ऐतिहासिक महत्त्व आहे. नागपूर शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी अंबाझरी उद्यान आकर्षणाचे केंद्र आहे. नागपूर महानगरपालिका आपले काम करीतच आहे. मात्र, जनतेनेही आपली जबाबदारी ओळखून आपल्या शहरातील अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तलाव आणि उद्यानांचे जतन करायला हवे, असेही ते म्हणाले.

  विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी अंबाझरी उद्यानाच्या सौंदर्यीकरणासाठी माजी खासदार अविनाश पांडे यांनी दिलेल्या निधीबद्दल आभार मानले. एका चांगल्या हेतूसाठी निधी खर्च झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जैवविविधता समितीच्या सभापती दिव्या धुरडे आणि नगरसेविका परिणिता फुके यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. अंबाझरी तलावासारखे शहरातील ऐतिहासिक वारसे जपण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. नागपूर महानगरपालिका गेल्या काही वर्षांपासून नदी स्वच्छता अभियानासारखे उपक्रम राबवित असल्याने नागरिकांमध्ये कमालीची जनजागृती झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

  प्रास्ताविकातून कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी अंबाझरी उद्यानात करण्यात आलेल्या सौंदर्यीकरण कामाची माहिती दिली. स्थापत्य कामे आणि विद्युतविषयक कामे असे दोन टप्प्यात कामे करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ३४ लाख ८० हजार ९५० रुपयांची स्थापत्य कामे, २४ लाख ८० हजार ९५० रुपयांची हिरवळीची कामे, चार लाख ९७ हजार ५०० रुपयांची खेळणी आणि चार लाख ७७ हजार १५० रुपयांचा निधी ग्रीन जीमवर खर्च करण्यात आला. याव्यतिरिक्त २४ लाख ९९ हजार ५५ रुपयांचा निधी हायमास्ट लाईटवर खर्च करण्यात आल्याची माहिती श्री. बोरकर यांनी दिली.

  यावेळी माजी खासदार अविनाश पांडे यांनी रिमोटची कळ दाबून सौंदर्यीकरणाची माहिती देणाऱ्या फलकाचे अनावरण केले. यानंतर त्यांनी स्वत: उपस्थित मान्यवरांसोबत सौंदर्यीकरण कामाची पाहणी केली. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्वश्री जयंत ठाकरे, अभिजित सपकाळ, संजय देशपांडे, रवींद्र दरेकर, अतुल लोंढे, मुजीब पठाण, कमलेश समर्थ, प्रकाश इटनकर, बाबा वकील, माजी नगरसेवक अनिल मछले, ईश्वर चौधरी आदी उपस्थित होते.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145