Published On : Mon, Jun 18th, 2018

मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राणे आणि ठाकरे एकत्र

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणुक आता चांगलीच चुरशीची होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला शह देण्यासाठी राज ठाकरे हे नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला पाठिंबा देणार असल्याची माहिती पुढे आली आहे. शिवसेनेचा पराभव करण्यासाठी हे नवीन राजकीय समीकरणं जुळल असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेच्या विरोधात नारायण राणे यांनी यापूर्वीही निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते. मात्र शिवसेनेच्या पराभवासाठी नारायण राणेंना आता राज ठाकरे यांचही सहकार्य लाभणार आहे. दरम्यान, मनसेकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीत कोकणात नारायण राणेंनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदावाराचा दारुण पराभव झाला होता.