नागपूर : धार्मिक श्रद्धेने नागद्वार यात्रेला गेलेल्या नागपूरच्या एका युवकाचा चट्टाण कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत तरुणाचे नाव दीपक सूरज नेवारे (वय २४, रा. बजेरिया) असे असून, तो शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक आपल्या चार-पाच मित्रांसह नागद्वार यात्रेसाठी गेला होता. सर्व मित्र डोंगर चढाई करत असताना अचानक एका मोठ्या चट्टाणाचा तुकडा डोंगरावरून खाली कोसळला आणि दीपक त्याच्या थेट झळा सापडल्यामुळे गंभीर जखमी झाला. तर त्याचे इतर मित्र थोडक्यात बचावले.
घटनेनंतर दीपकला तातडीने नर्मदापुरम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. ही घटना ऐकताच मित्रांनी यात्रा अर्धवट सोडली आणि दीपकचा मृतदेह घेऊन नागपूरकडे रवाना झाले.
बुधवारी नागपूरमध्ये दीपकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. धार्मिक यात्रेदरम्यान घडलेल्या या अपघाती मृत्यूमुळे नेवारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.