नागपूर – हिंगणा तालुक्यातील पांजरी (मोंढा) गावात कपडे वाळत घालताना करंट लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत महिलेचे नाव पार्वती किशोर खासदार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, पार्वती खासदार या आपल्या पती व दोन मुलींसह ९ मे रोजी सातनवरी (नागपूर) येथे भाच्याच्या विवाह समारंभासाठी आलेल्या होत्या. लग्न पार पडल्यानंतर १२ मे रोजी त्या आपल्या बहिणी व मेहुण्याच्या घरी पांजरी येथे राहण्यासाठी गेल्या होत्या.
संध्याकाळच्या सुमारास कपडे धुतल्यानंतर त्या कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी ताराजवळ गेल्या असताना तेथे असलेल्या उघड्या वायर्समुळे त्यांना जोरदार करंट बसला. करंट लागल्याने त्या जागीच बेशुद्ध होऊन कोसळल्या.
कुटुंबीयांनी तातडीने त्यांना हिंगणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात हलवले. तेथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.