Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Wed, Aug 14th, 2019
maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

पूरग्रस्त भागातील वीज ग्राहकांच्या सेवा पूर्ववत

महावितरणची प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी

मुंबई: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील महापुरामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केली असल्याने या भागातील म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील 24 व सांगली जिल्ह्यातील 10 अशी 34 उपकेंद्रे 13 ऑगस्ट पर्यंत सुरु करण्यात आली आहेत. तर उर्वरित भागातील वीजपुरवठा 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण केला जाईल, अशी माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मंत्रालय पत्रकार कक्ष येथे आयोजित या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे संचालक विश्वास पाठक, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, तसेच ऑपरेशन संचालक श्री.साबू उपस्थित होते.

कोल्हापुरातील 2884 व सांगलीतील 923 अशा एकूण 3807 रोहित्रांचा व 2 लाख 73 हजार 817 वीजग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरु केला आहे. स्वातंत्र्यदिनापर्यंत शेतीपंप वगळता पूर ओसरलेल्या भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कोल्हापूर-सांगलीतील 4 हजार महावितरणचे, दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्यातून आलेल्या 40 पथकातील 500 हून अधिक कर्मचाऱ्यांची टीम अहोरात्र झटत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आली असल्याचे श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्हयामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील कृष्णा पंचगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, कासारी, दुधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, तांब्रपर्णी या नद्या आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा वाहू लागल्या. कोल्हापूरातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची व सांगलीच्या आयर्विन पुलावर कृष्णा नदीच्या पातळीची नोंद केली जाते. कोल्हापूरला 43 फुट धोक्याच्या पातळीचा इशारा दिला जातो.सांगलीच्या बाबतीतही हाच इशारा धोक्याचा मानला जातो. पंचगंगा व कृष्णा या नदीने अनुक्रमे 55.7 व 57 फुटाची पातळी गाठली. गेल्या अनेक वर्षात महापुराने इतकी मोठी पातळी गाठली नव्हती.

महावितरणने सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेले निर्णय

या भागातील सर्व नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त वाहू लागल्याने नदीकाठच्या परिसरातील पाणीपुरवठा योजना व शेतीपंप, वीज वितरण यंत्रणा व ग्राहकांच्या उपकरणांचे नुकसान होवू नये यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला. कोल्हापूर व सांगली जिल्हयातील 42 उपकेंद्रे, वितरण रोहित्र 6,177, वाहिन्या 132 तसेच 3 लाख 90 हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव तात्पूरता बंद करण्यात आला. यामध्ये शहरातील 1 लाख 19 हजार ग्राहकांचा समावेश होता. हजारो रोहित्र व शेकडो वाहिन्या पूरात जाऊनही जेथे शक्य आहे त्या भागाला पर्यायी मार्गाने वीजपुरवठा देण्याचे काम दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यासाठी अनेकांनी पोहत जाऊन महापूरात कामे केलेली आहेत. पूर परिस्थिती लक्षात घेता बंद करण्यात आलेला वीजपुरवठा ग्राहकांना एसएमएस, व्टिटर, व्हॉटअप, आणि वृत्तपत्रात बातम्या देऊन वेळोवेळी वीज ग्राहकांना अवगत करण्यात आले. महावितरणने केलेल्या पूरग्रस्त क्षेत्रातील कामाबद्दल महावितरणच्या सर्व टीमचे अभिनंदनही श्री.बावनकुळे यांनी यावेळी केले.

विशेष दैनंदीन सनियंत्रण कक्ष

या महापूराचे गांभीर्य लक्षात घेवून महावितरणच्या मुख्यालयात विशेष दैनंदीन सनियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले. तसेच स्थानिक पातळीवर कोल्हापूर व सांगली 24 x 7 सनियंत्रण कक्ष वरिष्ठ अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले. पुराच्या पाण्यात महावितरणची किती यंत्रणा पाण्याखाली आहे याचा अंदाज घेवून ऊर्जा रोहित्र, वितरण रोहित्र, रिले व इतर साहित्य तातडीने उपलब्ध करण्यासाठी इतर परिमंडलाकडून मागविण्यात आले तसेच 315 केव्हीचे रोहित्र, लोखंडी पोल, केबल्स आदी तातडीने खरेदी करुन पूर ओसरण्यापूर्वी कोल्हापूर व सांगलीकडे पाठविण्यात आले. पूर ओसरल्यानंतर विदयुत पुरवठा सुरु करण्यासाठी बारामती व पुणे परिमंडलातील कुशल मनुष्यबळ या दोन्ही जिल्हयाकडे पाठविण्यात आले. याकरीता 40 पथके तयार करण्यात आले. या एका पथकामध्ये एका वाहनासह 1 अभियंता, 3 तांत्रिक कर्मचारी व कंत्राटदारांची 8 कामगार यांचा समावेश होता. याशिवाय प्रकल्पातील मोठया एजन्सींना विदयुत साहित्य व उपकरणे व मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याचे आदेश देण्यात आले. पुरामुळे विदयुत पुरवठा खंडीत झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होवू नये व त्यांनी संयम ठेवावा याकरिता समाज माध्यमांचा मोठया प्रमाणात वापर करण्यात आला.यामध्ये प्रत्येक ग्राहकांना मोठया प्रमाणात मोबाईलद्वारे एसएमएस पाठवून महावितरणची यंत्रणा वीज पुरवठा सुरु करण्यासाठी सज्ज असल्याची जाणीव करुन देण्यात आली. तसेच स्थानिक पथकातील कर्मचाऱ्यानी पुराच्या ठिकाणी जावून ग्राहकांना धीर देण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मंत्री श्री.बावनकुळे यांनी यावेळी दिली. एकूणच राज्यातील पूरपरिस्थितीमुळे महावितरणचे 523 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे ते म्हणाले.

सद्यस्थिती

• वीजपुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी मुख्यालय पातळीवरुन कोल्हापूर परिमंडलास लागणाऱ्या साधनसामुग्रीची व्यवस्था केली.

• आतापर्यंत विविध क्षमतेचे 3 पॉवर ट्रान्सफॉर्मर, 235 वितरण रोहित्रे, 780 पोल, सिंगलफेजचे 35 हजार व थ्री फेजचे 4 हजार मीटर मुख्यालयाने तातडीने कोल्हापूर परिमंडलास दिले. अजूनही साधनसामुग्री व आवश्यक मनुष्यबळ कोल्हापूरला येत आहे.

• पुरामुळे बाधित नागरिकांसाठी सुरू केलेल्या पूर्नवसन कॅम्पला महावितरणने त्याच दिवशी प्राधान्याने वीजपुरवठा केला. सांगलीत 94 तर कोल्हापुरात 26 कॅम्प आहेत. त्यातील 9 कॅम्पला सुरूवातीला जनरेटरने वीजपुरवठा करण्यात आला.

• 9 ऑगस्टपासून पाणी पातळी अतिशय संथ गतीने कमी होत गेली. पाणी ओसरताच महावितरणने सर्वप्रथम अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले. कोल्हापूर व सांगलीतील जिल्हा रुग्णालये, चालू असलेली महत्वाची खाजगी रुग्णालये, बसस्थानक, अग्निशामक दल, मनपा कार्यालये, पाणीपुरवठा योजना आदींना सुरू केले आहे.

• कोल्हापूरच्या कळंबा फिल्टर हाऊस, सांगली-मिरज जॅकवेल, कोल्हापूर एमआयडीसी, कागल, गडहिंग्लज, कळे, वडगाव आदी शहर येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठाही प्राधान्याने सुरू केला आहे. परंतु, बहुतांश पाणीपुरवठा नदीकाठीच असल्याने त्या योजनांचे पंप हाऊसच पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी महावितरणचा वीजपुरवठा सुरू आहे. मात्र मनपा, नप अथवा ग्रामपंचायतीकडून ते सुरु केले जात नाहीत.

ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेद्वारे वीज पुरवठा देणे शक्य आहे व तसेच जे उपकेंद्रे सुस्थितीत होते तिथून वीज पुरवठा वळवून सुरु करण्यात आला तसेच पुनर्वसन केंद्रानांही वीजपुरवठा देण्यात आला. तसेच ज्याठिकाणी शक्य आहे त्याठिकाणी जनरेटरर्सची व्यवस्था करुन ग्राहकांना वीजपुरवठा देण्यात आला. जसजशी पाण्याची पातळी ओसरु लागली तशी महावितरणची यंत्रणा पुन्हा जोमाने कामाला लागली. 9 ऑगस्ट पासून पहिल्यांदा पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, बसस्थानक, अग्नीशमन दल व घरगुती ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास सुरुवात करण्यात आला. 13 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्हयातील 24 व सांगली जिल्हयातील 10 अशी एकूण 34 उपकेंद्रे सुरु करण्यात आली. कोल्हापूर जिल्हायातील 2884 व सांगली जिल्हयातील 923 अशा एकूण 3807 रोहित्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येवुन 2 लाख 74 हजार ग्राहकाचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला.

सद्यस्थितीत कोल्हापूर मंडलामध्ये गांधीनगर व आवाडेमळा अशी दोन उपकेंद्रे व सांगली मंडलामध्ये शेरीनाला, बालाजी मंदीर, दुधगाव, कवठेपिराण, पनुद्रे व ब्रह्यनाळ अशी 8 उपकेंद्रे सध्या बंद आहेत.

15 ऑगस्टपर्यंत शेतीपंपाचा विजपुरवठा वगळून दोन्ही जिल्हयातील ग्राहकांचा वीजपूरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145