नागपूर : अखेर १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखला जाणारा अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनानंतर गुरुवारी संध्याकाळी त्याची सुटका करण्यात आली.
गोपनीयतेसाठी तुरुंग प्रशासनाने मागील दरवाजातून गवळीला बाहेर काढले. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेत त्याला थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले. गवळी तेथून विमानाने मुंबईकडे रवाना झाला.
२००७ मध्ये घाटकोपर येथे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खुनाच्या आरोपाखाली गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. या काळात तो वारंवार जामिनासाठी प्रयत्नशील होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच त्याला जामीन मंजूर करून दिला.
न्यायालयाने जामीन मंजूर करताना स्पष्ट केले होते की, अटी-शर्ती मुंबई सत्र न्यायालय निश्चित करेल. त्या अनुषंगाने सत्र न्यायालयाचा आदेश तुरुंग प्रशासनाकडे आल्यानंतर अखेर गवळीची सुटका शक्य झाली.
जामसांडेकर प्रकरणातील शिक्षा भोगल्यानंतर १८ वर्षांनी गवळी कारागृहाबाहेर पडल्याने पुन्हा एकदा त्याच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.