नागपूर : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मोठा घाव बसला आहे. भारतीय हवाई दलाच्या अचूक कारवाईत कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा मोठा हिस्सा संपला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मसूद अझहरच्या भाऊ, बहिणी आणि नातेवाईकांसह एकूण १४ जण ठार झाले आहेत.
याच हल्ल्यात मसूदचा भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या हल्ल्यात मसूद अझहरचा मुलगा हुजैफा देखील ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
दहशतवादी कारवायांसाठी कुख्यात असलेले हे कुटुंब पाकव्याप्त काश्मीरमधील एका सुरक्षित तळावर वास्तव्यास होते. मात्र भारताने अचूक गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत या ठिकाणी जोरदार हल्ला केला. या घटनेनंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
मसूद अझहर याने भारताविरुद्ध अनेक वेळा मोठे कट रचले असून, संसद हल्ला, उरी हल्ला आणि पठाणकोट हल्ल्यासारख्या गंभीर घटनांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. त्यामुळे भारतासाठी तो कायमच मोठा धोका मानला जात होता. त्याच्या कुटुंबावर झालेल्या या निर्णायक कारवाईमुळे दहशतवाद्यांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की भारत आता शांत बसणार नाही.