जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना धगधगत होती. आज या संतापाचे उत्तर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिले आहे.
6 मेच्या रात्री भारतीय लष्कर आणि वायुदलाने पाकिस्तान आणि पाक अधिकृत कश्मीरमधील 9 पेक्षा जास्त दहशतवादी तळांवर हल्ला करून त्यांचा नायनाट केला. या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला आणि लगेचच जगासमोर स्वतःची निर्दोष प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि सैन्य अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या प्रत्येक खोट्याचा पर्दाफाश केला.
या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी बुधवारी झालेल्या अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये तिघांनी सहभाग घेतला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि दोन शौर्यवती महिला अधिकारी: कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह. या दोघींनी भारतीय लष्कराच्या शौर्याची गाथा जगासमोर मांडली.
विंग कमांडर व्योमिका सिंह कोण आहेत?
18 डिसेंबर 2004 रोजी भारतीय वायुदलात सामील झालेल्या व्योमिका सिंह यांना लढाऊ हेलिकॉप्टर्स उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी चेतक, चीता यांसारख्या हेलिकॉप्टर्सवर प्राविण्य मिळवले आहे. 2017 मध्ये त्यांना विंग कमांडरपदी पदोन्नती मिळाली.
लहानपणापासूनच त्यांनी वायुदलात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे नाव ‘व्योमिका’ म्हणजे “आकाशाला मुठीत ठेवणारी” याचा अर्थ त्यांच्या स्वप्नाशी जोडलेला आहे. त्यांनी UPSC मार्फत वायुदलात प्रवेश घेतला आणि अनेक संकटांच्या वेळी धाडसी निर्णय घेणाऱ्या पायलट म्हणून स्वतःला सिद्ध केले.
2021 मध्ये त्यांनी वायुदलाच्या महिला पथकाबरोबर माउंट मणिरंग सर केला आणि इतिहासात आपले नाव कोरले.
कर्नल सोफिया कुरैशी कोण आहेत?
कर्नल सोफिया कुरैशी या भारतीय लष्करातील ‘कॉर्प्स ऑफ सिग्नल’ विभागाशी संबंधित आहेत. त्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय सैनिकी सराव ‘फोर्स 18’ (2016) मध्ये भारताच्या सैन्याचं नेतृत्व केलं.
35 वर्षीय सोफिया या गुजरातच्या असून सैनिकी पार्श्वभूमीतून येतात. बायोकेमिस्ट्रीमध्ये डिग्री घेतलेली असून, त्यांनी सुमारे 6 वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मिशनमध्ये कांगोमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं.
प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी हिंदीतून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची माहिती देऊन, जागतिक पातळीवर भारताची भूमिका स्पष्टपणे मांडली.
‘ऑपरेशन सिंदूर’ काय होतं?
22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून 6 मेच्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील आणि POKमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. ही कारवाई अत्यंत नियोजित आणि अचूक होती.हे ऑपरेशन केवळ लष्करी विजय नव्हे, तर भारताच्या दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक ठरलं आहे.भारताच्या या दोन्ही महिला अधिकाऱ्यांनी केवळ सैन्याचं शौर्यच नाही, तर संपूर्ण देशाच्या मनगटातली ताकद जगाला दाखवून दिली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ कारवाई नव्हे, तर भारताच्या आत्मसन्मानाची पुनःस्थापना आहे.