Published On : Tue, Feb 16th, 2021

नऊ झोन सभापतींची अविरोध निवड; आसीनगर झोनमध्ये बसपाचा विजय

Advertisement

महापौरांनी केले नवनिर्वाचित झोन सभापतींचे अभिनंदन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन सभापती पदासाठी मंगळवारी (ता.१६) निवडणूक पार पडली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दहाही झोन सभापतींच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते. नागपूर महानगरपालिकेच्या १० पैकी ९ झोनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली. मंगळवारी झोनमध्ये ऐनवेळी काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने या झोनमध्येही भाजपच्या उमेदवाराचा अविरोध विजय झाला. एकूण १० पैकी ९ झोन सभापतींची अविरोध निवड झाली. आसीनगर झोनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराने बाजी मारली.

लक्ष्मीनगर झोनच्या सभापती म्हणून प्रभाग ३६च्या नगरसेविका पल्लवी अशोक श्यामकुळे, धरमपेठ झोन सभापतीपदी प्रभाग १५चे नगरसेवक सुनील दुलिचंद हिरणवार, हनुमाननगर झोन सभापतीपदी प्रभाग ३२च्या नगरसेविका कल्पना राम कुंभलकर, धंतोली झोन सभापती म्हणून प्रभाग ३३च्या नगरसेविका वंदना भानुदास भगत, नेहरूनगर झोन सभापतीपदी प्रभाग ३०च्या नगरसेविका स्नेहल सतीश बिहारे, गांधीबाग झोन सभापतीपदी प्रभाग २२च्या नगरसेविका श्रद्धा विजय पाठक, सतरंजीपुरा झोन सभापतीपदी प्रभाग ५च्या नगरसेविका अभिरूची अनिल राजगिरे, लकडगंज झोन सभापती म्हणून प्रभाग ४च्या नगरसेविका मनीषा चक्रधर अतकरे या सर्व भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची अविरोध निवड झाली. मंगळवारी झोन सभापतीपदासाठी भाजपाकडून प्रभाग १च्या नगरसेविका प्रमिला प्रीतम मथरानी व काँग्रेसकडून प्रभाग १०च्या नगरसेविका साक्षी विपीन राऊत यांनी उमेदवारी दाखल केली होती. पीठासीन अधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार साक्षी राऊत यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे या झोनच्या सभापती म्हणून भाजपच्या प्रमिला प्रीतम मथरानी अविरोध निवडूण आल्या. एकूणच नऊ झोनच्या सभापतींची निवड बिनविरोध झाली.

मोहम्मद जमाल यांच्यासह काँग्रेस तटस्थ
आसीनगर झोनमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या झोनच्या सभापती पदासाठी तीन उमेदवारांनी नामनिर्देशन सादर केले होते. यामध्ये भाजपकडून प्रभाग ३च्या नगरसेविका भाग्यश्री गणेश कानतोडे, बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ६च्या नगरसेविका वंदना राजू चांदेकर व प्रभाग ७चे नगरसेवक मोहम्मद जमाल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज सादर केला होता. पीठासीन अधिकाऱ्यांनी तिनही अर्ज वैध असल्याचे नमूद करून अर्ज मागे घेण्यासाठी निर्धारित वेळ उमेदवारांना दिला. या वेळेमध्ये अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे व बसपाच्या वंदना चांदेकर यांच्यात थेट लढत झाली.‌ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जुळलेल्या झोनच्या नगरसेवकांनी यावेळी हात उंचावून मतदान केले. यामध्ये भाजपाच्या भाग्यश्री कानतोडे यांना तीन मते मिळाली तर बसपाच्या वंदना चांदेकर यांना एकूण ६ मते प्राप्त झाली. बसपाच्या वंदना राजू चांदेकर यांचा ३ मतांनी विजय झाल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी घोषित केले.

विशेष म्हणजे, या निवडणुकीत अर्ज मागे घेतलेले अपक्ष उमेदवार मोहम्मद जमाल यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक दिनेश यादव, परसराम मानवटकर या नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. तर काँग्रेसचेच नगरसेवक संदीप सहारे, मनोज सांगोळे, नगरसेविका भावना लोणारे अनुपस्थित होते.

तुळशीरोप देऊन महापौरांनी केला सत्कार
झोन सभापती म्हणून निवडून आलेल्या सर्वांचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी अभिनंदन केले. सत्तापक्ष कार्यालयाबाहेर त्यांनी तुळशीरोप देऊन पल्लवी श्यामकुळे, सुनील हिरणवार, कल्पना कुंभलकर, वंदना भगत, स्नेहल बिहारे, श्रद्धा पाठक, अभिरूची राजगिरे, मनीषा अतकरे, प्रमिला मथरानी या नवनिर्वाचित झोन सभापतींचा सत्कार केला.

यावेळी आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, नासुप्र चे विश्वस्त भूषण शिंगणे, प्रतोद दिव्या धुरडे, सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती महेंद्र धनविजय, अग्निशमन विशेष समिती सभापती ॲड.संजय बालपांडे, लकडगंज झोनचे विद्यमान झोन सभापती राजकुमार साहु, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संजय बंगाले, नगरसेविका सोनाली कडू, भाग्यश्री कानतोडे, सुषमा चौधरी, निरंजना पाटील, नसीम बानो इब्राहिम खान, नगरसेवक संजय महाजन, ॲड. निशांत गांधी आदी उपस्थित होते.