नागपूर : राज्यपालांना सरकारी विमान नाकारणे, हा राज्यपाल महोदयांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेचा अपमान आहे. राज्य सरकारचे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. राज्य सरकारच्या विरुद्ध बोलणे, सरकारवर टिप्पणी करणे, त्यांच्या चुकीच्या कारभारावर बोट ठेवणे या सगळ्या बाबी जणू राज्याचा अपमान केला की काय? असे या राज्य सरकारला वाटते आणि म्हणूनच हे तिघाडीचे सरकार सूडबुद्धीचे राजकारण करीत आहे.
सत्तेच्या लालसापोटी आपल्या विचारधारेची हत्या करणारे आता लोकतंत्राची हत्या करायला निघाले. सत्तेचा माज या सरकारला आलेला आहे, अजून वेळ गेलेली नाही. सूडबुद्धीचे राजकारण सोडून विकासकामाकडे लक्ष द्या, नाहीतर जनता मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. याचे भान सरकारने राखले पाहीजे.
एकीकडे संसदेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या बाबतीत सांगताना किंवा गुलाम नबी आझाद यांचे बाबतीत बोलताना भावूक झाले. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांचा अपमान करणारे कृत्य करतात, भारतरत्नांच्या बाबतीत सत्त्तारूढ पक्षाच्या नेत्यांकडून अनर्गल भाषेचा वापर, पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, माजी सैनिकांना मारहाण हे सगळे कृत्य सूडभावनेच्या राजकारणातून उत्पन्न झालेले आहे.
अशी प्रतिक्रिया आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केली.

