Published On : Fri, Nov 29th, 2019

अनधिकृत बांधकाम दोन दिवसात तोडा : महापौर संदीप जोशी

अंबाझरी उद्यानात ‘वॉक अँड टॉक विथ मेयर’: कचरा, स्वच्छता, अतिक्रमण, मोकाट जनावरे, कुत्रे, प्रसाधगृह आदींबाबत नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा

नागपूर : शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, शिवाय नागरिकांना त्रासही सहन करावा लागतो. अंबाझरी परिसरातील हिंगणा मार्गावरही अनधिकृत बांधकाम करून तिथे अवैध व्यवसाय सुरू असून अशा सर्व ठिकाणांवर कारवाई करून दोन दिवसात अनधिकृत बांधकाम तोडा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

‘वॉक अँड टॉक विथ मेयर’ उपक्रमांतर्गत गुरुवारी (ता.२८) महापौर संदीप जोशी यांनी आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे अंबाझरी उद्यानात नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, नगरसेविका वर्षा ठाकरे, परिणीता फुके, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार आदी उपस्थित होते.

यावेळी अरविंद डाबके यांनी अंबाझरी उद्यानातील प्रसाधनगृहामध्ये स्वच्छता राहत नसून उद्यानात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह असावे, अशी मागणी केली. गांधीनगर यशवंत कॉलनी येथे मोकाट जनावरे, कुत्री यांच्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय परिसरात कच-याच्या समस्येबाबत अनेकदा तक्रार करूनही काहीही कार्यवाही न झाल्याची तक्रार दिपीका देशपांडे यांनी केली. दिपीका देशपांडे यांच्या तक्रारीवर गांभीर्य दाखवित महापौर संदीप जोशी यांनी तात्काळ सदर ठिकाणी भेट देउन निरीक्षण केले व परिसरात कच-याची समस्या सोडविण्याबाबत अधिका-यांना निर्देश दिले.

रामकृष्ण उके यांनी भांगे लॉनच्या मागील बाजूला गजानन नगर येथे गडर लाईनचे चेम्बर खुले असल्याने अनेकदा अपघाताचा धोका निर्माण झाल्याची तक्रार मांडली. उद्यानातील प्रसाधनगृहामध्ये नेहमी स्वच्छता राहावी, अशी मागणीही त्यांनी केली. भैय्यासाहेब शेलारे यांनी परिसरातील कच-याच्या समस्येशी अवगत केले. परिसरातील कच-याची स्वच्छता करून सदर ठिकाणी मनपातर्फे फलक लावण्याची सूचना केली. अनेक रहिवासी क्षेत्रामध्ये घराच्या पुढे उतार केल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पाणी जमा होते. अशाप्रकारचे बांधकाम करणा-यांवर मनपातर्फे दंडात्मक कारवाई केल्यास मनपाला उत्पन्नाचे स्त्रोत मिळेल, अशी सूचना नत्थू रंभाड यांनी मांडली. यशवंत नगर येथे मैदानाची दयनीय अवस्था असून येथे मोकाट जनावरे, कुत्रे आणि समाजिक तत्वांचा वावर असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार यशवंत धांडेकर यांनी मांडली.

गांधीनगर मेट्रो स्टेशनच्या कामामुळे उत्तर अंबाझरी मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. येथील वाहतुकीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मोकाट कुत्रे वाहनांच्या मागे धावत असल्याची तक्रार विनायक परांजपे यांनी मांडली. वर्मा लेआउटमध्ये खुल्या प्लॉटमध्ये कचरा टाकला जातो त्यामुळे डासांचा त्रास सहन करावा लागत असल्याचे बाबुलाल मेश्राम यांनी सांगितले. रमेश वोरा यांनी अंबाझरी तलावाच्या काठावर करण्यात आलेले पिचींग निघत असल्याचे निदर्शनास आणून दिले. उद्यानाकडून ते संपूर्ण पारीला नव्याने पिचींग करण्याची त्यांनी सूचना मांडली. न्यू वर्मा लेआउटमध्ये मागील ७ ते ८ महिन्यांपासून वैद्यकीय कचरा टाकण्यात येत असल्याची तक्रार श्री.कोलारकर यांनी केली.

अंबाझरी उद्यानात काही वर्षांपूर्वी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप खेळणी होती. विद्युत कारंजे, मिनी ट्रेन अशा साहित्याने लहानग्यांमध्ये आकर्षण होते. मात्र आता उद्यानात अशी कोणतिही व्यवस्था नाही, मुख्य द्वारावर घाण आहे, अशी तक्रार श्री. सावरकर यांनी केली. अंबाझरी उद्यानातील वॉकींग ट्रॅकची दुरूस्ती करणे, प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि समाजिक तत्वांवर आळा बसण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी शिवचंद नेहरवाल यांनी केली. अविनाश सोनवणे यांनी वर्मा लेआउट येथील सार्वजनिक मैदानात पावसाळ्यात पाणी साचत असून त्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली. कस्तुरबा लेआउट येथील घरांमध्ये पाणी शिरण्याची भिती पावसाळ्यात असते. येथील मैदानात अतिक्रमण करण्यात येत असल्याने मुलांना खेळण्यासाठी जागाच नसल्याची तक्रार डॉ.अविनाश वैद्य यांनी मांडली. सुदामनगरीतील अरुंद रस्त्यांमुळे नागरिकांना अनेक त्रास होत असल्याची तक्रार संजू बिल्हाडे यांनी केली. फुटपाथची उंची कमी असल्याने त्यावरूनही वाहने जातात त्यामुळे पायी चालणा-यांनी कुठून जावे, असा प्रश्न दिलीप लिमसे यांनी मांडला. गोपाल नगर येथे रस्त्याला अतिक्रमणाच्या विळख्यात घेत त्याला प्लाट म्हणून जाहीर केल्याचा प्रताप किशोर गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिला. अंबाझरी उद्यानाच्या मुख्य द्वारावर पहारा देणा-या चौकीदारांसाठी चौकी असावी, अशी मागणी लक्ष्मण शेळके यांनी यावेळी केली.

नाझीत तभाने, प्रशांत तडस, जगदीश जोशी, एस.डी.मेश्राम, नितीन डांगोरे, शत्रुघ्न लोणारे, विठ्ठल देशमुख, केदार गोखले, प्रकाश देशपांडे यांच्यासह अनेक नागरिकांनी यावेळी समस्यांसह आपल्या सूचना मांडल्या.

महापौर निधीतून प्रसाधनगृहांचीच निर्मिती होणार : महापौर संदीप जोशी

अंबाझरी उद्यानामध्ये येणा-या नागरिकांसाठी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र प्रसाधगृहाची व्यवस्था असणे आवश्यक आहे. शहरात आज अनेक ठिकाणी प्रसाधनगृहांची आवश्यकता आहे. त्यामुळे महापौर निधीचा वापर केवळ प्रसाधनगृहांसाठीच करण्यात येणार आहे. महापौर निधीमधून पहिले प्रसाधनगृह हे अंबाझरी उद्यानात बनेल व येत्या काही दिवसातच त्याचे भूमिपूजन केले जाईल, अशी घोषणा महापौर संदीप जोशी यांनी यावेळी केली. अंबाझरी उद्यानातील प्रसाधनगृहाची नियमीत स्वच्छता करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. कचरा, स्वच्छता, घरासमोरील रस्त्याकडे केलेला उतार या बाबी आपल्या सवयींशी जुळलेल्या आहेत. आपले शहर ही आपली संपत्ती आहे त्यामुळे प्रत्येकाने स्वत:लाच शिस्त लावणे आवश्यक आहे. या सर्व समस्या प्रशासनाला निर्देश देउन सुटणार आहेत मात्र आपण स्वत:ला शिस्त लावून घेतल्यास अनेक समस्या निर्माणही होणार नाही, असा विश्वास यावेळी महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.