Published On : Fri, Nov 29th, 2019

शहरासाठी कडक निर्णय घ्या…!

Advertisement

अधिकारी-कर्मचाऱ्यांना महापौरांचे निर्देश : धंतोली-गांधीबाग झोनमध्ये घेतली बैठक

नागपूर: शहराकडे आतापर्यंत खूप दुर्लक्ष झाले. आपल्यामुळेच अतिक्रमणधारकांची हिंमत वाढत गेली. जर असेच सुरू राहिले तर नागपूर शहर विद्रुप होईल. त्यामुळे आता जोमाने कामाला लागा. नियमावर बोट ठेवून कडक निर्णय घ्या, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

कचरा संकलन, अतिक्रमण आणि इतर काही विषयांसंदर्भात आढावा घेण्यासाठी सध्या झोननिहाय बैठक घेण्यात येत होते. गुरुवारी (ता. २८) धंतोली आणि गांधीबाग झोनमध्ये झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धंतोली येथील बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह झोन सभापती लता काडगाये, क्रीडा सभापती तथा नगरसेवक प्रमोद चिखले, नगरसेवक संदीप गवई, विजय चुटेले, नगरसेविका विशाखा बांते, जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, भारती बुंदे, हर्षला साबळे, वंदना भगत, सहायक आयुक्त किरण बगडे, झोनल आरोग्य अधिकारी पाटील उपस्थित होते. गांधीबाग येथील बैठकीला झोन सभापती वंदना यंगटवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक मनोज चापले, ॲड. संजय बालपांडे, जुल्फेकार अहमद भुट्टो, नगरसेविका श्रद्धा पाठक, सुमेधा देशपांडे, आशा उईके, श्रीमती अंसारी सैय्यद बेगम मो. निजामुद्दीन, जिशान मुमताज मो. इरफान, सरला नायक, सहायक आयुक्त अशोक पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र राहाटे, झोनल आरोग्य अधिकारी खरे आदींची उपस्थिती होती.

महापौर संदीप जोशी यांनी उपस्थित नगरसेवकांकडून कचरा संकलनात सध्या काही दिरंगाई होत आहे काय, कचरा उचल करण्याची सद्यपरिस्थिती काय आहे, आरोग्य निरीक्षकांचे त्यावर नियंत्रण आहे, अथवा नाही, याबद्दल माहिती घेतली तर आरोग्य निरीक्षकांकडून कचरा संकलनासंदर्भात आणि सुधारणेसंदर्भात काही सूचना मागविल्या.

धंतोली झोनमधील नगरसेवकांनी अद्यापही बऱ्याच परिसरात कचऱ्याची उचल योग्य वेळेत होत नसल्याची कैफियत मांडली. धंतोली झोनमध्ये एकूण ३४ गाड्या असून पाच गाड्यांची अधिक आवश्यकता आहे. पार्वती नगर, जोगी नगर पर्यंत गाडी पोहचत नसल्याचे नगरसेवक संदीप गवई यांनी सांगितले. नगरसेविका जयश्री वाडीभस्मे यांनी सकाळी सफाई कर्मचारीच येत नसल्याची तक्रार केली. महाजन आटा चक्की आणि मनीषनगर परिसरात यामुळे कचऱ्याचे साम्राज्य असते. नगरसेविका विशाखा मोहोड यांनीही कचरा संकलन केंद्र हलविण्याची सूचना मांडली. त्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या उभ्या राहात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. कचरा नेणाऱ्या गाड्यांतून कचरा रस्त्यावर सांडत असल्याने दुर्गंधी पसरत असल्याची बाब त्यांनी लक्षात आणून दिली. इंदिरा नगर,जाटतरोडी या भागात साफसफाई होत नसल्याचे नगरसेविका हर्षला साबळे यांनी लक्षात आणून दिले. कुकडे ले-आऊट कचरा संकलन केंद्रावरील कंटेनर अद्याप हटविण्यात आले नसल्याचे नगरसेविका वंदना भगत यांनी सांगितले. या ठिकाणी लोकं अद्यापही कचरा टाकत असल्याने उपद्रव शोध पथकातील सदस्याची नियुक्ती करण्याची विनंती केली.

गांधीबाग झोनमधील बैठकीत नगरसेविका जिशान मुमताज यांनी कचरा संकलनासाठी वेळोवेळी फोन करूनही कर्मचारी येत नसल्याचे लक्षात आणून दिले. लहान गल्ल्यांमध्ये गाड्या जात नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी सांगितले. नगरसेविका श्रद्धा पाठक यांनीही कचरा संकलन होत नसल्यावरून रोष व्यक्त केला. २२ वस्त्यांमध्ये आपण स्वत: दररोज जाऊन कर्मचाऱ्यांकडून कचरा संकलनाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र गाड्या अजूनही येत नाही. या भागात घंटा गाडीची आवश्यकता त्यांनी बोलून दाखविली. नगरसेवक जुल्फेकार अहमद भुट्टो यांनी मोमीनपुरा परिसरातील हॉटेल्समधून निघणारा कचरा उचलण्याला प्राधान्यक्रम देण्यास सांगितले. बकरा मार्केटचा प्रश्न नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांनी मांडला. शहरातील कॅटरींग व्यावसायीक समारंभातील उरलेले अन्न नाल्यांमध्ये टाकत असल्याची बाबही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली.

नगरसेवकांच्या सर्व प्रश्नावर महापौर संदीप जोशी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. नगरसेवकांनी मांडलेल्या सर्व समस्या दोन दिवसात सोडविण्याचे निर्देश दिले. नरेंद्र नगर येथे सध्या ज्या ठिकाणी कचऱ्यागाड्या पार्क केल्या जातात, त्या दोन ठिकाणी पार्क करण्याचे निर्देश दिले. नरेंद्र नगर येथील कचरा संकलन केंद्र तातडीने जागा शोधून इतरत्र हलविण्याचे निर्देशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. कंटेनर हटविल्यानंतरही जर नागरिक त्या ठिकाणी कचरा टाकत असेल तर तेथे उपद्रव शोध पथकाचे सदस्य नेमून दंड वसूल करा, असेही निर्देश त्यांनी दिले. गांधीबाग झोनमधील २२ वस्त्यांमध्ये असलेल्या वस्त्यांमध्ये कचरा संकलन गाड्या तातडीने पाठविण्याचे निर्देश त्यांनी दिले. बकरा मार्केटला शनिवार ३० नोव्हेंबर रोजी भेट देणार असून तोपर्यंत तेथील प्रश्न निकालात काढण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. कॅटरींग व्यावसायीकांनी आपल्या व्यवसायाची नोंद महापालिकेकडे करावी. प्रशासनाने त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेशही महापौर संदीप जोशी यांनी दिले. अतिक्रमणधारकांना तातडीने नोटीस द्या. तरीही अतिक्रमण काढले नाही तर न्यायालयाच्या निर्देशानुसार तातडीने तो तोडा, असेही कडक निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

-तर कचरा समस्येवर विशेष सभा
शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणाचा प्रश्न मनपा पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतला आहे. या विषयावर विशेष सभाच बोलविण्यात आली आहे. कचऱ्याचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे. नवी व्यवस्था उभारून आज १२ दिवस झालेत. चांगली व्यवस्था निर्माण होण्यासाठी नगरसेवक पूर्णपणे सहकार्य करतील. मात्र, संयमाचा कंपन्यांनी तुटू देऊ नये. सुधारणा झाली नाही तर या विषयावरही विशेष सभा बोलविण्यात येईल, असा इशाराही महापौर संदीप जोशी यांनी दिला. कचरा संकलनासंदर्भात ५ डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम महापौर संदीप जोशी यांनी दिला असून त्याच दिवशी सायंकाळी यासंदर्भात ते संपूर्ण आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.