नागपूर: बेसा-पिपळा रोडवरील पिरॅमिड सिटी ३ या गृहनिर्माण संकुलात अनेक फ्लॅटधारकांकडून त्यांच्या फ्लॅटमध्ये अंतर्गत फेरबदल (इंटर्नल अल्टरेशन) केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांमध्ये बांधकाम परवानग्या किंवा गृहनिर्माण सोसायटीच्या संमतीशिवाय आरसीसी फ्रेमच्या रचनेत बदल करणं आढळून येत आहे.
विशेष म्हणजे, अशा बेकायदेशीर फेरबदलांमुळे इमारतीची संरचनात्मक समतोलता (डायनॅमिक बॅलन्स) बिघडण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे भविष्यात इमारतीच्या मजबुतीवर परिणाम होऊन दुर्घटनेचा संभाव्य धोका निर्माण होतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे.
या गंभीर प्रकरणाकडे नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट (NIT), पिपळा नगर पंचायत आणि इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. गृहनिर्माण सोसायटीची संमती न घेता किंवा अधिकृत परवानगीशिवाय अशा प्रकारे केलेले बदल हे बांधकाम नियमांचे उल्लंघन असून, ते सहन होणारे नाहीत, असा सूर स्थानिक रहिवाशांमधून उमटत आहे.
रहिवाशांचा मागणीसुर :
बेकायदेशीर फेरबदल करणाऱ्या फ्लॅटधारकांवर कठोर कारवाई करावी.
संपूर्ण इमारतीची स्ट्रक्चरल ऑडिट करून संभाव्य धोके शोधावेत.
भविष्यात अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई व्हावी.
पिरॅमिड सिटी ३ ही नागपूरमधील वाढत्या गृहनिर्माण क्षेत्रांपैकी एक असून, सुरक्षित वास्तव्य ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून नागरिकांच्या जीविताला धोका पोहोचवणाऱ्या कृतींना आळा घालणे अत्यावश्यक बनले आहे.