नागपूर (सदर) : शहरातील अत्यंत वर्दळीच्या सदर भागात भरदुपारी घडलेल्या मोठ्या चोरीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. श्रीराम टॉवरसमोर रस्त्यालगत उभी असलेल्या फॉर्च्युनर गाडीची काच फोडून चोरट्यांनी तब्बल २५ लाख ५० हजार रुपये रोख आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. सदर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी दुपारी २.२० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. फ्रेंड्स कॉलनीत राहणारे पेट्रोल पंप व्यवसायिक फराज सिद्दीकी हे आपल्या फॉर्च्युनर कारमधून पेट्रोल पंप व एका भागीदाराच्या ढाब्याची मिळून २५.५ लाख रुपयांची रोकड घेऊन घरी परतत होते. वाटेत त्यांनी सदर येथील श्रीराम टॉवरमध्ये एका मित्राची भेट घेण्यासाठी गाडी थांबवली.
सुरक्षा रक्षकाने गाडी पार्किंगमध्ये लावण्याचा सल्ला दिला होता, मात्र गाडीत मोठी रक्कम असल्यामुळे सिद्दीकी यांनी ती रस्त्यालगतच उभी केली. सुमारे एक तासानंतर ते परतले असता त्यांनी पाहिले की, गाडीच्या मागच्या बाजूची काच फोडून बॅग चोरीला गेली आहे.
बॅगेत रोख रकमेसह काही महत्त्वाची कागदपत्रे होती. घटनेची माहिती मिळताच सदर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. मात्र, एलआयसी चौक परिसरातील काही महत्त्वाचे सीसीटीव्ही बंद असल्याची बाब समोर आली असून, त्यामुळे तपासास अडथळा येत आहे.
पोलिसांना संशय आहे की, ही घटना कोणत्यातरी अंतर्गत माहितीच्या आधारे (टिपवरून) घडवण्यात आली असावी. त्यामुळे त्या दिशेनेही चौकशी सुरू आहे. सदर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.