Published On : Mon, Apr 2nd, 2018

…सरसंघचालक हे हिंदुत्वविरोधी, देशद्रोही ठरवले जाणार आहेत काय? – उद्धव ठाकरे

Advertisement

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे. ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराकडे कानाडोळा करून भारताचा विकास केला जाऊ शकत नाही. जोपर्यंत रायगड उभा आहे, तोपर्यंत भारतात शिवाजी जन्मण्याची शक्यता आहे. शिवाजी घरोघर असण्याची आवश्यकता आहे आणि तो माझ्या घरी असला पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले. शनिवारी (31 मार्च)रायगडावर शिवपुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. सरसंघचालकांच्या या विधानाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

”देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत झाली आहे हे सरसंघचालकांचे निरीक्षण आहे. राजकीय व्यवस्था व्यक्तिपूजक झाल्याचा हा परिणाम आहे. छत्रपती शिवरायांचे एक अष्टप्रधान मंडळ होते व स्वराज्याचा कारभार सल्लामसलतीतून पुढे जात होता. राजकीय व्यवस्था त्यामुळे मजबूत होती व छत्रपती हे जनतेचे राजे होते. आज नेमके काय घडते आहे? महागाईचा भडका उडाला आहे, शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. भ्रष्टाचार व अराजकाची आग लागली आहे. सरसंघचालकांनी रायगडावरून धूर पाहिला. सरसंघचालकांचे मतप्रदर्शन म्हणजे धूर व धुक्यातली प्रकाशकिरणे ठरावीत”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरसंघचालकांना सर्वत्र भ्रष्टाचाराचा धूर दिसतोय व त्यांनी तसे बोलून दाखवले. त्यामुळे सरसंघचालक हे हिंदुत्वविरोधी, देशद्रोही ठरवले जाणार आहेत काय? , असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

सरसंघचालक मोहन भागवत यांनी रायगडावर जाऊन भ्रष्टाचाऱ्यांचा कडेलोट केला आहे. देशात व महाराष्ट्रात शतप्रतिशत भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘भाजप’ची ‘मायबाप’ संस्था म्हणजे ‘मातृपितृ’ संस्था आहे. त्यामुळे सरसंघचालकांचे मतप्रदर्शन मोलाचे ठरते. देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे म्हणूनच भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने होत आहेत. त्याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा ‘हल्लाबोल’ सरसंघचालकांनी रायगडावर जाऊन केला. सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्या हल्लाबोलाचे नेतृत्व काही क्षणांसाठी जणू सरसंघचालकांनीच हाती घेतले काय असे वाटले. देशातील राजकीय व्यवस्था सपशेल कमकुवत झाली असून विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे खडे बोल सरसंघचालकांनी सुनावले आहेत. शिवसेनाप्रमुख व सरसंघचालकांच्या भूमिका देशाने नेहमीच गांभीर्याने घेतल्या. कारण या दोन्ही सर्वोच्च नेत्यांनी कधी निवडणुका लढवल्या नाहीत. ते कधी सत्तेच्या पदावर विराजमान झाले नाहीत, पण तळागाळात रुजलेल्या मजबूत हिंदुत्ववादी संघटनांचे नेतृत्व केले. देशाला दिशा व मार्गदर्शन केले. देशात काँग्रेसमुळे भ्रष्टाचार बोकाळला, त्यामुळेच सत्तापरिवर्तन झाले. देशात सत्तापरिवर्तन व्हावे म्हणून लाखो संघ स्वयंसेवकांनी तहानभुकेची पर्वा न करता कष्ट केले.

मात्र आज केंद्रात मोदींचे सरकार असतानाही देशात भ्रष्टाचार बोकाळला असल्याची तोफ सरसंघचालकांना डागावी लागली. भ्रष्टाचाराच्या मुद्द्य़ावर देशभरात वातावरण निर्माण झाले आहे व भ्रष्टाचाराच्या मुद्द्य़ावर गेला महिनाभर संसदेत विरोधकांनी काम होऊ दिलेले नाही. याच प्रश्नावर अण्णा हजारे यांनी दिल्लीत आंदोलन केले. सामाजिक संघटना व राजकीय पक्ष भ्रष्टाचाराविरोधी आंदोलने का करीत आहेत? असा जालीम प्रश्न सरसंघचालकांनी विचारला आहे. देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे असे कडक ताशेरे त्यांनी मारले. सरसंघचालक ‘बकवास’ किंवा खोटे बोलत आहेत असे कुणाला वाटल असेल तर त्यांनी तसे पुढे येऊन छातीठोकपणे सांगायला हवे. शिवसेना राष्ट्रहिताच्या व जनहिताच्या प्रश्नांवर सरकारवर टीका करते. त्याचा ‘मनोवैज्ञानिक’ दबाव भाजपच्या ‘बोलभांड’ नेत्यांवर पडतो. शिवसेना सत्तेत राहूनही सरकारवर टीका कशी काय करू शकते? शिवसेनेचे डोके ठिकाणावर आहे काय?, असा प्रश्न भाजपला पडत असतो, पण शिवसेना जे सांगते तेच सरसंघचालकांनी रायगडावर जाऊन जोरात सांगितले. भाजपचे सरकार असले तरी रिमोट कंट्रोल हा नागपुरात असतो. त्यामुळे सरकारचे ‘मालक’ सरसंघचालक आहेत. त्यांनीच भ्रष्टाचाराचा मुद्दा काढल्याने त्यांच्या हेतूंबाबत भाजप प्रवक्त्यांना शंका वाटते काय? सरसंघचालकांना सर्वत्र भ्रष्टाचाराचा धूर दिसतोय व त्यांनी तसे बोलून दाखवले. त्यामुळे सरसंघचालक हे हिंदुत्वविरोधी, देशद्रोही ठरवले जाणार आहेत काय? छत्रपतींचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवायचा असेल तर जातीपाती विसरून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे सरसंघचालकांनी सांगितले.

आम्ही भागवतांच्या भूमिकेचे स्वागत करतो. गुजरातमध्ये प्रदीप राठोड या २१ वर्षांच्या दलित तरुणाची त्याने घोडा विकत घेतला आणि त्यावर बसून तो गावात फिरला म्हणून हत्या झाली. हे कसलं लक्षण आहे? पंतप्रधानांच्या राज्यात हे घडले. प. बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमुळे हिंसाचार भडकला. तेथील आसनसोल हा भाग पेटला आहे. रामनवमीच्या मिरवणुकीत काही जणांनी तलवारी बाहेर काढल्या व प्रकरण पेटले. रामनवमीच्या मिरवणुकीत तलवारी कधीपासून तळपू लागल्या? अयोध्येत राममंदिर उभारणीची वचनपूर्ती होत नाही व रामाच्या मिरवणुकीत नंग्या तलवारीचे प्रदर्शन होते याचीही खंत सरसंघचालकांना नक्कीच वाटत असणार. देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत झाली आहे हे सरसंघचालकांचे निरीक्षण आहे. राजकीय व्यवस्था व्यक्तिपूजक झाल्याचा हा परिणाम आहे. छत्रपती शिवरायांचे एक अष्टप्रधान मंडळ होते व स्वराज्याचा कारभार सल्लामसलतीतून पुढे जात होता. राजकीय व्यवस्था त्यामुळे मजबूत होती व छत्रपती हे जनतेचे राजे होते. रयतेच्या काडीलाही स्वराज्याचे सरदार हात लावू शकत नव्हते. शिवरायांनी स्वराज्य रक्षणाच्या अनेक मोहिमा राबवल्या व शाहिस्तेखान, अफझलखान, औरंगजेबाचा पाडाव केला. आज नेमके काय घडते आहे? महागाईचा भडका उडाला आहे, शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. केंद्रीय विद्यालयांच्या ‘पेपरफुटी’चे धागेदोरे अ.भा. विद्यार्थी परिषदेपर्यंत पोहोचावेत यासारखे दुर्दैव नाही. भ्रष्टाचार व अराजकाची आग लागली आहे. सरसंघचालकांनी रायगडावरून धूर पाहिला. सरसंघचालकांचे मतप्रदर्शन म्हणजे धूर व धुक्यातली प्रकाशकिरणे ठरावीत.