नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. 2019 मध्ये ठाकरे यांनी वैचारिक शत्रू असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांशी हातमिळवणी केली. कारण ठाकरे मुख्यमंत्री पदाचे आकर्षण होते.ठाकरे चुंबकाप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीकडे जात होते, असा घणाघात फडणवीस यांनी केला. ठाकरेंच्या राजकीय निवडी या सुसंगत विचारसरणीऐवजी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेने प्रेरित होत्या, असेही ते म्हणाले.
नागपूरच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच दौऱ्यात शुक्रवारी काटोल येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते.
ज्या व्यक्तीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली त्याचा नाश झाल्याचे आपण पहिले आहे. ठाकरे यांनी आपली विचारधारा सोडल्यामुळे इतके वर्ष त्यांच्यासोबत असलेल्यांनी त्यांची साथ सोडली, असेही फडणवीस म्हणाले.
महाविकास आघाडी (एमव्हीए) सरकार स्थापन करण्यासाठी 2019 च्या निवडणुकीनंतर ठाकरे यांनी भाजपच्या पाठीत वार केला, याचा पुनरुच्चार करून फडणवीस म्हणाले की, किल्ला परत जिंकण्यासाठी भाजपने शिवाजी महाराजांचे गनिमी कावा तंत्र अवलंबले. “आम्ही त्यांच्या गटातील वैचारिक मित्रांना परत आणले आणि तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना सरकार पुन्हा स्थापन केले , असेही फडणवीस म्हणाले.
मोदींच्या नेतृत्वाखाली 2024 च्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार आहे. मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांचा चांगला विकास होत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
काटोल आणि नरखेड या दोन्ही गावांनी स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पंतप्रधानांच्या जल जीवन मिशन अंतर्गत, या शहरांना पाणीपुरवठा करण्यात आला. मोदी सरकारने गरिबांना गॅस सिलिंडर आणि स्वच्छता सुविधा देण्याच्या योजनाही सुरू केल्या, असेही फडणवीस म्हणाले.