Published On : Tue, Jul 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

उद्धव ठाकरे हा कलंकित करंटा… चंद्रशेखर बावनकुळे यांचे टीकास्त्र

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. फडणवीस म्हणजे ‘नागपूरचा कलंक’ असे विधान ठाकरेंनी केले. त्यांच्या या विधानानंतर भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत झाशी राणी चौकात ठाकरे यांचा पुतळा जळत त्याचा निषेध केला. यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या कामांचा उल्लेख करत ठाकरेंवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी पुन्हा जर फडणवीस यांच्यावर टीका केली तर नागपूरची जनता तुम्हाला जोड्याने मारेल. उद्धव ठाकरे यांनी ओबीसी आणि मराठा समाजाचे आरक्षण घालवले, मेट्रो प्रकल्प बंद पाडले . इतकच नाही तर हा हा कलंकित करंटा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरेंचे संतुलन बिघडले असेल तर त्यांनी मनोरुग्णालयात जावे. नागपुरात मनोरुग्णालय आहे तिथे जाऊन उपचार घ्या. तुम्ही बावचळले असाल तर डॉक्टर बदला. परंतु, यापुढे जर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोललात तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी दिला. आज आम्ही नागपुरातील रस्त्यावर उतरलो.

पुढचं आंदोलन तुम्हाला माहिती नाही कुठं होईल. आमचे लोक तुमच्या गाड्या अवडल्याशिवाय राहणार नाहीत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला तुम्ही जबाबदार आम्ही नाही तर तुम्ही असाल, असेही बावनकुळे उद्धव ठाकरेंना म्हणाले.