नागपूर : उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी असल्याची टीका महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अमित शाह यांच्यावर ठाकरे यांनी टीका केली होती. त्यावर बावनकुळे यांनी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरेंना आमदार खासदार सोडून जातात मात्र त्यांना जाग येत नाही. त्यांचे नेतृत्व कोणालाही मान्य नाही, असा घाणाघातही बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका म्हणजे वेडेपणाचं लक्षण आहे. हा बिनडोकपणा आहे. आमच्या नेत्यांवर किंवा पक्षावर टीका करून काहीही साध्य होणार नाही आहे. आज आहे त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होईल,असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आमदार आणि खासदारांना योग्य वागणूक दिली असती, तर महाराष्ट्रात ही परिस्थिती निर्माण झाली नसती. राहिला प्रश्न २०१९ चा, तर गद्दारी केलीचना. गद्दारी झालीच त्यांच्याकडून. ते सरळ भारतीय जनता पक्षासोबत निवडून आले होते.
महाराष्ट्राला गद्दारीचे जे गालबोट लागले ते उद्धव ठाकरेंनी लावले आहे. त्यांनीच गद्दारीची सुरुवात केली. जर त्यांनी तेव्हा भाजपासोबत गद्दारी केली नसती, तर महाराष्ट्राचे वेगळे चित्र असते. त्यामुळे आता दोष लोकांवर देणे, वादग्रस्त भाषणे करत राहणे, माध्यमांचा आणि महाराष्ट्राचा वेळ वाया घालवणे, त्यापेक्षा एका चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल, असेही बावनकुळे म्हणाले.