Published On : Mon, Jun 25th, 2018

ही तर ईश्वरी वरदाना’ची नरकपुरी झाली ; उद्धव ठाकरे

Advertisement

Uddhav Thackeray

मुंबई : ‘महाराष्ट्रासारख्या राज्यात कुटुंबेच्या कुटुंबे रोज आत्महत्या करीत आहेत. विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे. नव्हे, फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात ती पडू लागली आहे. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे त्यासाठी अभिनंदन! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळय़ा नागपुरात दडपू नका. ‘ईश्वरी वरदाना’ची नरकपुरी झाली आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदी-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्यांच्या घटना वारंवार समोर येत आहेत. काही घटनांमध्ये संपूर्ण कुटुंबीयांनी आत्महत्या करत जीवनयात्रा संपवल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनांवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला .

ब्रिटिशांचे राज्य हे ईश्वरी वरदान आहे असे तेव्हा काही लोकांना वाटत होते व त्यांनी या ईश्वरी वरदानाचे स्वागत केले होते. त्याचप्रमाणे देशात आणि महाराष्ट्रात मोदी व फडणवीसांचे राज्य हेसुद्धा अनेकांना ईश्वरी वरदानच वाटत होते. प्रत्यक्षात आज महाराष्ट्राची स्थिती भयंकर असून सर्वत्र भूक व गरिबीचे अराजक निर्माण झाले आहे. जगणे कठीण झाले म्हणून सामान्य लोक सहकुटुंब आपली जीवनयात्रा संपविताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरातच हत्या आणि आत्महत्यांनी कहर केला आहे.

दोन दिवसांपूर्वी कफ परेड येथील मच्छीमार नगरमध्ये ‘पटेल’ कुटुंबातील तिघांनी सामुदायिक आत्महत्या केली. गरिबी व आर्थिक चणचण हे आत्महत्येचे कारण आहे. मुलीच्या उपचारासाठी कर्ज काढले, पण मुलगी जगली नाही व कर्ज फेडता आले नाही या विवंचनेतून ‘पटेल’ कुटुंबाने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. शनिवारी वांद्रे येथील सरकारी वसाहतीत राहणाऱ्या चार जणांच्या ‘भिंगारे’ कुटुंबानेही गरिबीस कंटाळून आत्महत्या केली. राजेश भिंगारे हे तर मंत्रालयात कामास होते. तरीही त्यांना घरसंसार चालविणे कठीण होऊन बसले. मुलंबाळं शिकत होती, पण आर्थिक ओझे असहय़ झाल्याने त्यांनी कुटुंबासह आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. या सहकुटुंब आत्महत्यांच्या दुःखद बातम्यांची शाई वाळण्याआधीच पंढरपुरातील एका कोवळय़ा आत्महत्येने आमच्या मनावरील ताण वाढला आहे. पंढरपूरजवळील ईश्वर वठार या गावातील अलिशा लवटे या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. आपल्या शिक्षणामुळे वडिलांचे आर्थिक ओझे वाढत आहे, पण उत्पन्न वाढत नाही.

त्यामुळे मुलांचे शिक्षण चालवायचे की चूल पेटवायची? हा प्रश्न अलिशाचे वडील हणमंत लवटे यांना पडला. वडिलांची ही ओढाताण अलिशाला सहन झाली नाही. तिने सरळ आत्महत्या केली व मरताना लिहून ठेवले, ‘माझे शिक्षण थांबल्यास माझ्या भावा-बहिणीचे शिक्षण पूर्ण होईल म्हणून मी आत्महत्या करीत आहे.’ एका शेतकऱ्याच्या मुलीचा हा आक्रोश भाजप सरकारला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात कुठे भुकेने बळी जात आहेत तर कुठे बेरोजगारी, महागाईने माणसे मरत आहेत. सतत गरिबीशी झुंजणाऱ्या बापाने आपल्याच दोन चिमुरडय़ांचा गळा आवळून खून केला व स्वतःही आत्महत्या केली. संतुजी फटांगरे (३५) असे त्या शेतमजुराचे नाव.

संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वरातील ही घटना ताजी आहे. अशा अनेक आत्महत्या कधी समोर येतात तर कधी अंधारातच राहतात. आतापर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी आम्ही संघर्ष करीत होतो, पण मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रातही ‘गरिबी’ आणि भूकमारीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे आकडे रोज वाढत आहेत. हेच काय तुमचे ते अच्छे दिन? कारभार करणारे फक्त राजकारणात व ओरबडण्यात मश्गूल असल्यामुळे लोक तडफडून मरत आहेत. महाराष्ट्राचे हे सर्व चित्र पाहता हे राज्य बरे चालले आहे असे कुणी म्हणू शकेल काय? तसे कुणी म्हणत असेल तर त्यांचे धाडस व त्यांच्या हिंमतबाज छाताडांचे कौतुक करावे लागेल. मुख्यमंत्री नुकतेच मोठा परदेश दौरा करून आले. विकास व प्रगतीची गंगा ते परदेशातून घेऊन आल्याचे जाहीर झाले. मोठी गुंतवणूक परदेशातून येईल व राज्य आबादी आबाद होईल असे त्यांना वाटते, पण इथे लोक रोज भूक व गरिबीमुळे मरत आहेत. त्यांच्या मुखात तुमच्या स्वप्नातील गंगेचे दोन थेंबही जात नाहीत.

पंतप्रधान मोदी गरीबांच्या संदर्भात काही करतील या भ्रमातून आता बाहेर पडावे लागेल. देशाचा विकास दर म्हणजे ‘जीडीपी’ वाढला आहे असे एकच तुणतुणे वाजवले जाते, पण विकास दराचा असा कोणता प्रकाश पडला की, त्यामुळे महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात कुटुंबेच्या कुटुंबे रोज आत्महत्या करीत आहेत. विकास दर वाढला म्हणजे काय हे गरीबांना माहीत नाही. गरीबांचे मरण मात्र स्वस्त झाले आहे.

माधुरी दीक्षित, सलमान खान, टाटा, बिर्ला, अंबानी, अदानींकडे संपर्क मोहिमा राबविणाऱ्यांचा ‘संपर्क’ गरीबांच्या प्रश्नांपासून तुटला आहे. सरकारला गरीबांचे प्रश्न समजत नाहीत. बुलेट ट्रेन, मेट्रो, हायपर सिटीसारखे महागडे व श्रीमंती प्रकल्प गरीबांच्या आत्महत्या रोखू शकणार नसतील तर आग लावा तुमच्या त्या श्रीमंती थाटाच्या प्रकल्पांना! भिंगारेच्या कुटुंबाची ‘शवपेटी’ म्हणून आम्ही त्या बुलेट ट्रेनकडे पाहत आहोत. खुद्द मोदी-शहांच्या गुजरातमध्ये शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनसाठी ‘सुपीक’ जमिनी देण्यास विरोध केला आहे. ‘बुलेट ट्रेन’पेक्षा शेतकऱ्यांच्या प्राथमिक गरजा भागवा असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाखाली ‘अराजक’ हेच तुमचे अच्छे दिन असतील तर त्या अराजकात गरीबांच्या सामुदायिक आत्महत्यांचीच आहुती पडणार आहे. नव्हे, फुले, आंबेडकर, शाहूंच्या महाराष्ट्रात ती पडू लागली आहे. विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नागपुरात घेतले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांचे त्यासाठी अभिनंदन! पण उर्वरित महाराष्ट्रात शेतकरी, गरीब, मजूर, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत. त्यांचा आक्रोश आणि किंकाळय़ा नागपुरात दडपू नका. ‘ईश्वरी वरदाना’ची नरकपुरी झाली आहे.