
नागपूर : शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असताना सक्करदरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोठा ताजबाग परिसरातील सूफी अली मोहम्मद गौस दरगाहसमोर संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या तेलंगणातील दोन युवकांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून १ किलो ३०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
ही कारवाई १८ सप्टेंबर रोजी करण्यात आली. सक्करदरा पोलिसांचे पथक परिसरात गस्तीवर असताना मुस्लिम कब्रस्तानातील दरगाहसमोर दोन युवक संशयास्पद अवस्थेत आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजासह दोन मोबाईल फोन, बॅग आणि रोख रक्कम असा एकूण ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे रागल्ला भुवन रागल्ला राजेशम (२१) आणि निम्मा विजय श्रीनिवास (२०) असून, दोघेही तेलंगणातील जगतियाल जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
या प्रकरणी NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत आहेत.




