
नागपूर : नागपूरच्या मेडिकल रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १० मधून मकोका प्रकरणातील आरोपी फरार झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गँगवार प्रकरणातील आरोपी शेख समीर शेख रहीम याला उपचारासाठी १६ सप्टेंबर रोजी मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेख समीर शौचालयात गेला. याच वेळी त्याने शौचालयाची खिडकी तोडून रुग्णालयातून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच क्राइम ब्रँच, बीट मार्शलसह पोलिसांची विविध पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.
समीर शेखविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध न्यू कामठी पोलीस ठाण्यात सात, कलमना येथे चार, तर गणेशपेठ, तहसील, नंदनवन आणि खापरखेडा पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. लूटमार, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि गँगवाराशी संबंधित गंभीर गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.
दरम्यान, मकोकासारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी रुग्णालयातून पसार झाल्याने त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर विभागीय कारवाई होण्याची शक्यता आहे.




