Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 11th, 2018

  महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार

  नवी दिल्ली : महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन येथे ‘20 व्या तंत्रज्ञान दिवसा’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन उपस्थित होते. तंत्रज्ञान विकास बोर्डचे अध्यक्ष तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रा.आशुतोष शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  तंत्रज्ञान आधारित उत्पादनाच्या यशस्वी व्यावसायिकरणासाठी पुरस्कार

  पालघर जिल्ह्यातील वसई पश्चिम येथील एएनटीएस सिरॉमिक प्रायवेट लि. या कपंनीला सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग श्रेणीतील द्वितीय श्रेणीचा पुरस्कार मिळाला. झिरकोनिया सिरॉमिक उत्पादने आणि कार्बन सल्फर पात्र बनविण्यासाठी राष्ट्रपती श्री.कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कंपनीचे संचालक सब्यासची रॉय आणि अश्विनी जैन यांनी स्वीकारला. 15 लाख रूपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

  झिरकोनिया हा धातू भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, हा धातू मुख्यत: निर्यात केला जातो. त्यापासून बनलेल्या पक्क्या वस्तू भारतात आयात होतात. या धातुपासून बनणाऱ्या वस्तू अधिक प्रमाणात संरक्षण दलात वापरल्या जातात. झिरकोनिया या धातुपासून संरक्षण दलाला उपयोगी असणाऱ्या वस्तू पुरविणारी एएनटीएस सिरॉमिक प्रायवेट लि. कंपनी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  जैव तंत्रज्ञानासाठी पुरस्कार

  पुणे जिल्ह्यातील निगडी येथील ज्ञान प्रबोधिनी संस्थेच्या शिक्षिका आणि वैज्ञानिक संगीता अतुल कुलकर्णी यांना जैवतंत्रज्ञान विषयाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी तसेच ग्रामीण भागात प्रचार-प्रसार करण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ.हर्ष वर्धन यांच्या हस्ते ‘जैवतंत्रज्ञान सामाजिक विकास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीमती कुलकर्णी यांना हा पुरस्कार व्यक्तीगत श्रेणीत मिळाला. पुरस्कार स्वरूपात 5 लाख रूपये रोख आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

  ज्ञानप्रबोधीनीच्या निगडी येथील संस्थेमध्ये वर्ष 2002 पासून जैवतंत्रज्ञान विषय सुरू करण्यात आला. जैवतंत्रज्ञान विभागाची संपूर्ण जबाबदारी श्रीमती संगीता कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली. श्रीमती कुलकर्णी जैवतंत्रज्ञान दूत म्हणुनच ज्ञानप्रबोधिनीत काम करतात. जैवतंत्रज्ञान हा विषय ज्ञानप्रबोधिनीमध्ये आठवीपासून शिकविला जातो. आतापर्यंत 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना जैवतंत्रज्ञान विषयात गोडी निर्माण व्हावी, अशा प्रयोगशील पद्धतीने शिकविण्यात आलेला आहे. यासह शेतकरी, बचत गटातील महिला, ग्रामस्थांना जैवतंत्रज्ञानाचे विविध उपयोग आणि फायदे सांगण्यात आले. याची दखल केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभागाने घेतली. या श्रेणीमध्ये अन्य दोघांनाही हा पुरस्कार देण्यात आला.

  तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी करावा : राष्ट्रपती कोविंद

  कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रपती श्री.कोविंद म्हणाले, भारताने अणुबॉम्बची चाचणी करून जागतिक पातळीवर भारतीय तंत्रज्ञानाची मोहर उमटविली आहे. भारताने नेहमीच शांततेसाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापरावर भर दिलेला आहे. यापुढेही तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी व्हावा, असे आवाहन राष्ट्रपती कोविंद यांनी केले.

  वैद्यकीय क्षेत्रात, कृषी क्षेत्र आणि इतर सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे सामान्य जनतेला भरपूर लाभ झालेला आहे. आज 21 व्या शतकात अनेक आव्हाने आहेत. ज्यांचे उत्तरही वर्तमान तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांच्या हातात आहेत. वैज्ञानिकांनी भारतीयांना सुलभ आणि सुविधापूर्ण असे तंत्रज्ञान विकसित करावे. या क्षेत्रात मुलींना अधिकाधिक सहभागी करणे गरजेचे असल्याचे विचार मांडले. नवतंत्रज्ञानाच्या विकासामुळे भारतसह संपूर्ण जग बदलू शकते, अशा भावना व्यक्त व्यक्त केल्या.

  यावेळी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145