Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, May 11th, 2018

  थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्यांचा पुरवठा राज्यभर सुरु करण्यात यावा – आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख

  मुंबई: राज्यभरातील थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची नेमकी आकडेवारी किती आहे, याची माहिती घेण्यात यावी. तसेच या सर्व रुग्णांना त्यांच्या गावाजवळच्या आरोग्य केंद्रात मोफत गोळ्या उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे. गोळ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यापद्धतीने तातडीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांनी आज विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

  थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांचे पालक आणि स्त्रीरोग तज्ञांची FOGSI ही संघटना यांच्या समवेत आज मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस राज्याचे आरोग्य संचालक डॉ.संजीव कांबळे, सहाय्यक संचालक डॉ.रेगे, राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ.अरुण थोरात, स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेचे सचिव डॉ.जयदीप शंक, थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांच्या पालकांचे प्रतिनिधी सुनील वर्तक आदी उपस्थित होते.

  सार्वजनिक आरोग्य विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची संख्या ही सुमारे ८ हजार ५०८ इतकी आहे. पण ही संख्या सुमारे ३० हजार इतकी असण्याची शक्यता बैठकीत वर्तविण्यात आली. त्यामुळे थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची माहिती अद्ययावत करण्यात यावी, अशी सूचना यावेळी राज्यमत्र्यांनी दिली. तसेच सध्या राज्यातील फक्त ६ केंद्रांवर थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्या पुरविल्या जातात. थॅलेसेमीयाग्रस्त रुग्ण राज्यभर असल्याने गोळ्यांचा पुरवठा राज्यभर करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तेव्हा राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर या गोळ्यांचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. तसेच गोळ्यांची आवश्यकता लक्षात घेऊन हाफकीन संस्थेकडे तशी मागणी तात्काळ नोंदविण्यात यावी. ही कार्यवाही तातडीने करावी व थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची कोणताही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री श्री.देशमुख यांनी आरोग्य संचालकांना दिल्या.

  प्रबोधनासाठी मोहीम राबवावी

  राज्यमंत्री श्री. देशमुख म्हणाले, थॅलेसेमीया आजाराचे प्रमाण वाढत आहे. मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत गरोदरपणात काळजी घेतल्यास तो टाळता येऊ शकतो. यासाठी महिलांनी गरोदरपणाच्या काळात थॅलेसेमीया मायनर ही चाचणी करणे हिताचे आहे. एखाद्या गरोदर महिलेत हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी आढळल्यास डॉक्टरांनीही थॅलेसेमीया संदर्भातील चाचण्या करुन घेण्याबाबत सजग असणे आवश्यक आहे. या आजाराचे वाढते स्वरुप व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याबाबत मोठी प्रबोधन मोहीम राबविणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाने विविध प्रसिद्धी माध्यमांमधून तशी प्रबोधन मोहीम राबवून लोकांना तसेच डॉक्टरांनाही या आजाराबाबत सजग करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

  या आजारासंदर्भात गोळ्यांशिवाय इतर औषधोपचाराचीही उपलब्धता करण्यात यावी. तसेच रुग्णांना आठवड्याभराऐवजी महिन्याभरातील गोळ्या एकत्रीत द्याव्यात, त्यामुळे त्यांना वारंवार आरोग्य केंद्रात यावे लागणार नाही व औषधोपचारामध्ये देखील खंड पडणार नाही, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री.देशमुख यांनी यावेळी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच या रुग्णांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही केंद्र शासनाच्या नियमावलीनुसार करण्यात यावी, असेही त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

  काय आहे थॅलेसेमीया आजार ?

  थॅलेसेमीया हा रक्ताचा एक गंभीर अनुवंशिक आजार आहे. या आजारात रुग्णाच्या रक्तामध्ये पुरेशा प्रमाणात हिमोग्लोबीन तयार होत नाही. रुग्णास वारंवार रक्त संक्रमण द्यावे लागते. लाल पेशी नष्ट होत असल्याने अवयवांमध्ये लोहाचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त जमा होते. या आजाराचे थॅलेसेमीया मायनर व थॅलेसेमीया मेजर असे दोन प्रकार आहेत. थॅलेसेमीया मायनर व्यक्तिचा विवाह थॅलेसेमीया मायनर किंवा थॅलेसेमीया मेजर जोडीदारासोबत न करण्याचा सल्ला देण्यात येतो. थॅलेसेमीया आजाराच्या दोन व्यक्तिंचा विवाह झाल्यास त्यांचे अपत्यही थॅलेसेमीयाग्रस्त जन्मण्याची ७५ टक्के शक्यता असतो. त्यामुळे गरोदर मातांनी अन्य चाचण्यांसोबत थॅलेसेमीया मायनर ही चाचणी करण्याबाबत तज्ज्ञ डॉक्टर सल्ला देतात.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145