Published On : Thu, Jul 2nd, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात दिल्लीतील दोन अल्पवयीन बहिणी सुरक्षित; रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने दुर्घटना टळली

Advertisement

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या दिल्लीतील दोन अल्पवयीन बहिणींना रेल्वे पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले. चौकशीनंतर या दोघी दिल्लीतील अपहरणप्रकरणातील बेपत्ता मुली असल्याचे समोर आले. रेल्वे पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.

३० जून रोजी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर १५ आणि १३ वर्षीय दोन मुली कोणत्याही पालकांशिवाय फिरताना आढळल्या. महिला रेल्वे पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला असता, त्या २६ जून रोजी दिल्लीतील घरातून कोणालाही न सांगता छत्तीसगडमधील डोंगरगड येथे गेल्याचे त्यांनी सांगितले. तेथून परतताना त्या नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्या होत्या.

पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता, दिल्लीतील मैदान गढी पोलीस ठाण्यात दोघींच्या अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. त्यानंतर मुलींना तातडीने पाटणकर चौक येथील बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आले. दिल्ली पोलीस आणि पालक नागपुरात आल्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुलींना त्यांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

विशेष म्हणजे, जून २०२६ महिन्यात नागपूर रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून एकूण १० अल्पवयीन मुला-मुलींची सुरक्षित सुटका केली आहे. ही कारवाई रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी गौरव गावंडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.